पोलिसांच्या दागिने लॉकरकडे सांगलीकरांची पाठ--लोकमत विशेष
By admin | Published: January 4, 2015 11:57 PM2015-01-04T23:57:25+5:302015-01-05T00:38:28+5:30
पोलिसांवर अविश्वास : उपक्रमाचा नारळही फुटला नाही, सुरक्षेच्या प्रश्नाबाबत नागरिकांतूनच उदासीनता..
सांगली : परगावी जाणाऱ्या नागरिकांचे दागिने सुरक्षित रहावेत, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करून दागिने ठेवण्यासाठी लॉकर उघडले. जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र या उपक्रमाकडे सांगलीकरांनी पाठ फिरवल्याने या योजनेचा नारळही फुटला नाही.
शहरात सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याविषयी पोलिसांनी अनेकदा आवाहन केले. अगदी घरोघरी जाऊन जागृतीविषयी पत्रकांचेही वाटप केले होते. मात्र या आवाहनास नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे परगावी जाणाऱ्या नागरिकांचे दागिने पोलीस ठाण्यातील ‘लॉकर’मध्ये जमा करून घेण्याचा प्रयोग जिल्ह्यात प्रथमच राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. पण पोलिसांकडे कधी जायचे? तिथे दागिने कसे ठेवायचे? पुन्हा आणायला कधी जायचे? याचा विचार करून लोक आले नसावेत, असा अंदाज बांधला जात आहे.
लोक परगावी गेल्याची माहिती काढून चोरटे घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करतात. आयुष्याची कमाई काही क्षणात चोरट्यांच्या हाती लागते. घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पकडले जाते, मात्र सर्वच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत नाही. परगावी जाताना लोकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, घरात किमती ऐवज ठेवून जाऊ नये, असे अनेकदा पोलिसांनी आवाहन केले आहे. मात्र या आवाहनास लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. (प्रतिनिधी)
असा आहे
उपक्रम
परगावी जाताना लोकांनी त्यांच्या घरातील सर्व दागिने एका बॅगेत भरावेत व ही बॅग मुख्यालयातील कक्षात आणून जमा करावी. पोलीस कर्मचारी संबंधितांसमोर दागिन्यांची पाहणी करून बॅग सील करून ती जमा करून घेतील. गावाहून परतल्यानंतर सील फोडून बॅगेत दागिने आहेत का नाही, याची खात्री करून ती परत देतील. हे काम जबाबदारीचे होते. लोकांचे दागिने सुरक्षित रहात असतील, तर पोलिसांनी ही जबाबदारी पार पाडण्याची तयारी दर्शविली होती. मात्र सांगलीकरांनीच पुढाकार न घेतल्याने या उपक्रमाचा नारळही फुटला नाही.
नागरिकांचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्याचे काम जबाबदारीचे होते. दागिने सुरक्षित रहात असतील तर ही जबाबदारी आम्ही स्वीकारली होती. मात्र सांगलीकरांमधून कोणताही प्रतिसाद मिळाल नाही. किमान त्यांनी गावाला जाताना तरी याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरुन द्यावी.
- दिलीप सावंत,
जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली