सरकारच्या भंपकबाजीमुळे वस्त्रोद्योग देशोधडीला: प्रकाश आवाडे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:05 AM2018-11-19T01:05:06+5:302018-11-19T01:05:11+5:30
इचलकरंजी : केंद्र व राज्य सरकार पोकळ घोषणाबाजी करण्यातच धन्यता मानत आहे. पाच टक्के व्याज दराची सवलत ही केवळ ...
इचलकरंजी : केंद्र व राज्य सरकार पोकळ घोषणाबाजी करण्यातच धन्यता मानत आहे. पाच टक्के व्याज दराची सवलत ही केवळ नव्या यंत्रमागांसाठीच आहे. त्यामुळे या योजनेसाठी आजवर केलेल्या अर्जदारांना याचा काहीच लाभ मिळणार नाही. सरकारची निष्क्रियता झाकण्यासाठी चुकीच्या माहितीद्वारे दिशाभूल केली जात आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा भंपकबाजी करीत असल्याने यंत्रमाग उद्योगाची वाट लागली आहे, अशी टीका माजी मंत्री वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
केंद्र आणि राज्य सरकार हे केवळ घोषणांची वल्गना करणारे असल्यामुळे अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगातील एकाही घटकाला कोणतीही मदत मिळालेली नाही, असा आरोप करून माजी मंत्री आवाडे म्हणाले, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनाला दोन वर्षे लोटली, तरी त्यापैकी एकही योजना कार्यान्वित झाली नाही. नकारात्मक धोरणांमुळे उद्योगाची वाट लागली आहे.
कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात टफ्स ही ३० टक्के अनुदानाची सवलत भाजप सरकारने दहा टक्क्यांवर आणली. मात्र, अद्यापही तिचा लाभ मिळालेला नाही. वीज बिल सवलतीचा तर खेळखंडोबा केला आहे. कामगार कल्याण मंडळाची स्वतंत्र स्थापना करण्याऐवजी या मंडळात १२३ घटकांचा समावेश करून कामगारांचा विश्वासघात केला आहे, असाही आरोप माजी मंत्री आवाडे यांनी केला. पत्रकार परिषदेवेळी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, सुनील पाटील, विलास गाताडे, सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.
यंत्रमागधारकांना लवकरच व्याज सवलत
इचलकरंजी : यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याजाची सवलत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे व्याज सवलतीचे प्रस्ताव सादर केलेल्या यंत्रमागधारकांना लवकरच सवलत मिळेल, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. यंत्रमागधारकांनी विविध बॅँकांकडून घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याज सवलत पुढील पाच वर्षांसाठी द्यावयाची आहे. यातील त्रुटी दूर करून यंत्रमागधारकांनी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांना व्याज सवलत जाहीर केली आहे. वस्त्रोद्योग उपसंचालकांनी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांनी यंत्रमाग कर्जाचे प्रस्ताव जमा केले व ते आता मुंबई येथे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच ही सवलत मिळेल.