सरकारच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:47 AM2018-10-03T00:47:54+5:302018-10-03T00:47:59+5:30
इचलकरंजी : भाजप सरकारच्या व सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी केवळ वल्गनाच करीत आहेत. त्यामुळे वस्रोद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारूया, असे आवाहन माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
राष्टÑपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहर कॉँग्रेस समितीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
आवाडे म्हणाले, कॉँग्रेस आघाडीच्या काळात वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती. आज हा उद्योग मोडकळीस आला आहे. सरकारने घोषणा करून साखर वाटप करणे हेच काम केले आहे. त्याचा येथील उद्योजकांना कोणताही फायदा झाला नाही. दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत. हे कसे साजरे करायचे, असा प्रश्न वस्रनगरीत निर्माण झाला आहे.
यावेळी विलास गाताडे, राहुल आवाडे, प्रकाश मोरे, सुनील पाटील, सतीश राठी, नंदा साळुंखे, अंजली बावणे, नजमा शेख, राजू बोंद्रे, नरसिंह पारीक, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही मालक बनविलो, हे कामगार बनवत आहेत
कॉँग्रेस आघाडीच्या काळामध्ये आम्ही यंत्रमाग व्यवसायाला अनेक योजना देऊन कामगाराचा मालक बनविला. आता भाजप सरकार पुन्हा मालकाला कामगार बनवित आहे. अशा विचित्र परिस्थितीतून वस्रोद्योगाची वाटचाल सुरू आहे, अशी टीकाही माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.