वस्त्रोद्योगाला आता मंदीची चिंता

By admin | Published: September 11, 2015 10:55 PM2015-09-11T22:55:25+5:302015-09-11T23:44:00+5:30

सायझिंग कारखाने सुरू : संप मिटल्याने सुताच्या खरेदीत वाढ; मात्र किमती स्थिर

The textile industry is now concerned about the slowdown | वस्त्रोद्योगाला आता मंदीची चिंता

वस्त्रोद्योगाला आता मंदीची चिंता

Next

राजाराम पाटील - इचलकरंजी --सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या तब्बल ५२ दिवसांच्या संपानंतर शहर व परिसरातील सायझिंग कारखाने मोठ्या संख्येने सुरू झाल्यामुळे शुक्रवारी सुताची खरेदी वाढली, पण वस्त्रोद्योगात असलेल्या मंदीमुळे तीन-चार प्रकारच्या सुताचे भाव वगळता अन्य सुताच्या किमती वाढल्या नाहीत. सायझिंग कारखाने सुरू झाले. मात्र, वस्त्रोद्योगातील मंदी आता चिंतेचा विषय बनली आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी राज्य शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर केले. या किमान वेतनाच्या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने २१ जुलैपासून संप सुरू केला. संप मिटावा म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न झाले. अखेर शेवटी मंगळवारी (८ सप्टेंबर) खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कामगार नेते
ए. बी. पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपाची कोंडी फुटण्यास मदत झाली.सायझिंग कारखाने सुरू होणार म्हणून कापड तयार करण्यासाठी यंत्रमागधारक व कापड व्यापाऱ्यांनी सुताची खरेदी सुरू केली. गेल्या दोन-तीन दिवसांत साधारणत: पाच हजार बाचकी (२५ हजार किलो) सूत खरेदी करण्यात आली. त्यामुळे ३०, ३२ व ३४ नंबरच्या सुतामध्ये प्रतिकिलो एक ते दोन रुपयांनी वाढ झाली, तर पीसी प्रकारच्या सुताची किंमत किलोला दोन रुपयांनी वाढली. हा बदल वगळता अन्य प्रकाराच्या सुताचे भाव स्थिर राहिले. याला कारण म्हणजे वस्त्रोद्योगात असलेली मंदी व जुने खरेदी केलेले पण शिल्लक असलेले सूत असे सांगण्यात येते. तसेच बाजारामध्ये कापडाला मागणी नसल्याने यंत्रमागधारकांनीही जेमतेम लागेल एवढेच सूत खरेदी केले.
दरम्यान, पर्युषण पर्व सुरू झाल्यामुळे राजस्थान, गुजरात व
उत्तर प्रदेशामधील बाजारपेठांमधून आठवडाभर खरेदी थांबते. त्याचाही परिणाम कापडाच्या बाजारावर झालेला आहे. मात्र, वस्त्रोद्योगामध्ये कमालीची मंदी असून,
दीपावली सणापर्यंत कापड बाजारातील मंदी कायम राहील, असा अंदाज व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.

कामाची खोटी आणि
बोनसवरही परिणाम
सायझिंग-वार्पिंग कामगारांच्या संपामध्ये गेले दीड महिना बहुतांशी कामगारांच्या कामाची खोटी झाली आहे. या काळात उत्पादन नसल्याने पगार होणार नाही, तर याचा परिणाम दिवाळीत होणाऱ्या बोनस रकमेवर होणार आहे. त्यामुळे अजूनसुद्धा उशिरा येणाऱ्या कामगारांच्या वेतनावर आणखीन परिणाम होणार असल्याने आता कामगारांनी कामावर येण्यासाठी आणखीन वेळ लावू नये, असे आवाहन सायझिंगधारकांनी केले आहे.

वस्त्रनगरीचे जीवन आता पूर्वपदावर
कारखाना स्तरावर सायझिंगधारक व कामगारांमध्ये वेतनवाढीविषयी चर्चा होऊन शुक्रवारअखेर सुमारे ७० हून अधिक कारखाने सुरू झाले. राहिलेले ७० ते ८० कारखाने नजीकच्या दोन दिवसांत सुरू होतील. त्यामुळे पुढील आठवड्यात वस्त्रनगरीचे जीवन पूर्वपदावर येईल, अशी चर्चा येथील वस्त्रोद्योगात आहे.

Web Title: The textile industry is now concerned about the slowdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.