वस्त्रोद्योग नगरीत गुन्हेगारांची ‘धडधड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:45 AM2018-10-04T00:45:12+5:302018-10-04T00:45:16+5:30
अतुल आंबी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : इचलकरंजीत गेल्या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, घरफोडी असे २९२ गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. वस्त्रनगरीतील गुन्हेगारी वाढून तिची ‘क्राइम नगरी’कडे वाटचाल झाली आहे. या नगरीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १४ टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात आला, त्यांतील इचलकरंजीच्या सर्वाधिक दहा टोळ्या आहेत. त्यावरून या गुन्हेगारीचे स्वरूप स्पष्ट होते. पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या ७२ जणांवर कारवाई करून पोलिसांनी तेवढीच पिस्तुले जप्त केली आहेत.
गुन्हेगारीचा आलेख पाहता सन २००९ ते २०१५ पर्यंतच्या गुन्हेगारीच्या तुलनेत सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, गर्दी-मारामारी या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. तीन वर्षांमध्ये खून १८, खुनाचे प्रयत्न ४२, गंभीर मारहाण १७४, गर्दी-मारामारी ८० व घरफोड्या ७८ झाल्याचे चित्र दिसते. सुरुवातीला बाहेरहून कामानिमित्त आलेल्या कामगारांना धमकावणे, त्यांच्या पगारातील रक्कम काढून घेणे; येथून सुरू झालेला गुन्हेगारीचा प्रवास वाढत जाऊन मालक, उद्योजक, व्यापारी यांना धमकावत त्यांच्याकडून महिन्याला हप्ता ठरवून घेऊन खंडणी गोळा करण्यापर्यंत पोहोचला. खंडणीची रक्कम एक हजार रुपयांपासून ते एक कोटीपर्यंत असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. जो खंडणी देण्यास नकार देतो, त्याचा मुदडा पाडण्यासही हे गुन्हेगार मागे-पुढे बघत नव्हते. त्यामुळे त्यांची दहशत निर्माण होऊन गुन्हेगारी फोफावली. अशा अनेक गुन्हेगारांनी मोठे गुंड बनून अवैध मार्गाने मिळविलेला पैसा अवैध व्यवसायांत गुंतविला. त्यातूनही माया जमवत पुढे जाऊन ते दादा बनले. त्यानंतर राजकारणात घुसून नेतेही बनले.
अवैध व्यवसायांसह शहरात क्रिकेट बेटिंग (सट्टा), मटका, गुटखा, गुटखानिर्मिती कारखाना, गावठी दारूअड्डे, घातक शस्त्र व पिस्तूल जवळ बाळगण्याचे प्रकार, मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, फसवणूक अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढून दिसू नये, याची खबरदारी घेत मारामारीचे व गंभीर गुन्हेदेखील अदखलपात्र म्हणून दाखल केले जातात. अनेक गुन्हे नोंद न करता परस्पर मिटविण्याचेही प्रकार होत आहेत.
इचलकरंजी शहर परिसरातील अवैध व्यवसायही चांगलेच फोफावले आहेत. शहरातील कामगार वस्ती व अवैध व्यवसायातील वरपर्यंत निर्माण झालेली साखळी यामुळे हे व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत. फसवणूक करणे व वस्त्रोद्योगातील काही व्यवसायांमध्ये हस्तक्षेप करून कमिशनच्या नावाखाली दादागिरीने आपला वाटा ठेवणे. जागा खरेदी-विक्री व्यवहारात दमदाटीने सहभाग घेऊन आपला हिस्सा घेणे, असे अनेक प्रकार सुरू आहेत.
शहरातील पोलीस ठाण्यांतील दहा वर्षांमध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण पाहिल्यास गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. सन २०१५ पूर्वी शहरात दोन पोलीस ठाणी होती. सन २०१५ नंतर एक पोलीस ठाणे नवीन झाले. शिवाजीनगर, गावभाग (इचलकरंजी
पोलीस ठाणे) व नव्याने निर्माण झालेले शहापूर पोलीस ठाणे या तीनही पोलीस ठाण्यांतील दाखल गुन्हे पाहता, हा विळखा साºया शहरालाच बसल्याचे चित्र दिसते.
गुन्हेगारीचा आलेख असा
वर्ष २०१६
गुन्ह्याचा प्रकार शिवाजीनगर गावभाग शहापूर एकूण
खून ०४ ०० ०२ ०६
खुनाचा प्रयत्न ०२ ०१ ०२ ०५
गंभीर मारहाण २६ २० १० ५६
गर्दी, मारामारी २१ ०५ ०६ ३२
चोरी-घरफोडी १० ०३ ०६ १९
वर्ष २०१७
खून २ १ २ ५
खुनाचा प्रयत्न ११ ५ ४ २०
गंभीर मारहाण ३७ १७ २० ७४
गर्दी, मारामारी १७ २ ११ ३०
चोरी-घरफोडी २२ ८ १२ ४२
वर्ष २०१८ (आॅगस्टपर्यंत)
खून ४ २ १ ७
खुनाचा प्रयत्न १० ३ ४ १७
गंभीर मारहाण २५ १२ ७ ४४
गर्दी, मारामारी १४ १ ३ १८
चोरी-घरफोडी ११ --- ६ १७