ग्रंथ व्यक्तिमत्त्व घडवितात
By admin | Published: January 29, 2016 11:15 PM2016-01-29T23:15:04+5:302016-01-29T23:57:25+5:30
‘ग्रंथोत्सव’ परिसंवादातील सूर : सकारात्मक मनोवृत्तीसाठी पुस्तक वाचन आवश्यक
कोल्हापूर : आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडविणारी पुस्तकेच असतात. आपण कसेही असलो तरी आपला स्वीकार करणारी आणि त्यांच्या संगतीत राहिल्यास आपले व्यक्तिमत्त्व घडविणारा पुस्तकांइतका सुंदर सहवास दुसरा नाही. वाचनाचा संस्कार जितक्या लवकर होईल, तितके आपले व्यक्तिमत्त्व अधिक विकसित होत जाते, असा सूर ‘ग्रंथोत्सवा’मधील परिसंवादात पाहायला मिळाला.शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, यांच्यावतीने ‘कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव’ राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनात सुरू आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘ग्रंथाने मला काय दिले?’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्रा शिंदे, शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, भालचंद्र चिकोडे स्मृती मोफत वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संजय पवार होते.उपजिल्हाधिकारी पवार म्हणाले, शालेय वयात पुस्तक वाचनाची आवड निर्माण होते. आनंद मिळविण्यासाठी वाचन केले जात असले तरी पुस्तके सकारात्मक मनोवृत्ती निर्माण करतात. बालपणी पुस्तकांची निवड फार महत्त्वाची असते. वाचन कमी असले तरी चालेल; पण चांगली पुस्तके वाचावीत. पुस्तके निवडण्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करावे; तरच त्यांची वाचनातील अभिरुची वाढेल. ग्रंथ आपल्या जगण्याला दिशा देतात. चूक मान्य करण्याचे धाडस पुस्तके देतात. खरेपणासाठी लढण्याचे बळ महान व्यक्तींच्या आत्मचरित्र वाचनाने मिळते.
डॉ. खोत म्हणाल्या, सुजाण नागरिक घडविण्यासाठी ग्रंथालयांची आवश्यकता आहे. स्वयंप्रेरणेने मुलांनी वाचनाकडे वळावे, यासाठी त्यांच्या आसपास पुस्तके असावीत. पुस्तके अडचणींवर मात करण्याचे बळ देतात. अनुवादित पुस्तकांमुळे बाहेरच्या देशातील लेखकांच्या विचारांची, तिथल्या राहणीमानाची, संस्कृतीची ओळख होण्यास मदत होते.
युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. वनिता कदम व संतोष वडेर यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब कावळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप, उत्तम कारंडे, आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रातील ‘कथाकथन’ या कार्यक्रमात प्रा. अप्पासाहेब खोत यांनी ‘गवनेर’ व विजयराव जाधव यांनी ‘थैमाल’ या कथा सादर केल्या.
पुस्तके जगण्याची प्रेरणा
फक्त पुस्तके वाचणे इतकेच महत्त्वाचे नाही, तर वाचलेल्या पुस्तकांमधील आशय लक्षात ठेवून त्याचे अनुकरण प्रत्यक्ष आपल्या जीवनात करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुस्तक वाचनाने मनाला ऊर्जा आणि जगण्यास प्रेरणा मिळते. दु:ख हलके करण्यास पुस्तके मदत करतात. उत्तमोत्तम ग्रंथवाचनाची सवय असलेले लोक एक चांगला समाज निर्माण करू शकतात. वर्तमानात जगायचा सकारात्मक विचार ग्रंथ देतात, असे राहुल चिकोडे यांनी सांगितले.