थायलंडचा दोन्ही गटांत विजय
By admin | Published: July 27, 2014 12:45 AM2014-07-27T00:45:51+5:302014-07-27T01:12:44+5:30
वारणेतील कबड्डी स्पर्धेचा शानदार समारोप
वारणानगर : डोंबिवली संघाविरुद्धच्या विजयाने थायलंडच्या मुलींनी, तर तळसंदेच्या राष्ट्रसेवकवर थायलंडच्या मुले संघाने विजय मिळवून गेले सहा दिवस येथे चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण व सराव शिबिराचा आज, शनिवारी शानदार समारोप झाला.थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कबड्डी स्पर्धेतील वारणेच्या या शिबिरातील कौशल्येआधारे आशियाई स्पर्धा जिंकू, असा विश्वास थायलंडचे प्रशिक्षक सांप्रत पांचू यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या संयोजनातून थायलंड संघ प्रशिक्षण व सराव शिबिराचा समारोप वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील होते.
यावेळी थायलंडचे प्रशिक्षक सांप्रत पांचू व डॉ. रमेश भेंडीगिरी तसेच कर्णधार टीम पांचू (मुले) व अलिसा लिमसम्राण (मुली) यांचा आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रारंभी वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी संयोजक प्रा. अण्णासाहेब पाटील, प्रा. के. जी. जाधव, प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. पंच मंडळाचे सदस्य अजित पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)