सात महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ठकसेनास हैदराबादमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:50+5:302021-09-08T04:29:50+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरात अनेकांना गंडा घालून सात महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ठकसेनास जुना राजवाडा पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली. मीर ...
कोल्हापूर : कोल्हापुरात अनेकांना गंडा घालून सात महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ठकसेनास जुना राजवाडा पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली. मीर सरफराज अली (वय ४९, रा. चारमिनार, हैदराबाद, राज्य तेलंगणा) असे ठकसेनाचे नाव आहे. नोकरीचे आमिष दाखवून तसेच गोल्ड लोनवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून १८ लाख ५१ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी त्याच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल होता. त्याने आणखी चौघांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लॉकडाऊनमध्ये पूनम संजय अतिग्रे (रा. मंगळवार पेठ) यांची मीर सरफराज अली याच्याशी ओळख झाली. त्याने त्यांचा विश्र्वास संपादन करून त्यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १२ लाख रुपये उकळले. मयत पती संजय अतिग्रे यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये त्याने उकळले. शिवाय गोल्ड लोनवरही आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांचे सोने वेगवेगळ्या बॅंकेत गहाण ठेवून लोनची रक्कम परस्पर हडप केली. त्याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुधीर कानडे व रामचंद्र म्हेत्तर यांचे प्रत्येकी १ लाख रुपये, विशाल संकपाळ यांचे ७० हजार रुपये, मोहन चाचे यांचे १ लाख ३० हजार रुपये घेऊन त्यांनाही गंडा घातल्याचे चौकशीत पुढे आले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने अतिग्रे यांनी दि. २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, दि. ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
मोबाईल लोकेशनवरून शोध
गुन्हा दाखल झाल्यापासून मीर सरफराज अली हा फरारी होता, पोलीस त्याचा शोध घेत होते. मोबाईल लोकेशनवरून तो हैदराबादमधील राणीगंज येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खास पोलीस पथक पाठवून तेथे लॉजवर छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या.
फोटो नं. ०७०९२०२१-कोल- मीर सरफराज अली (आरोपी)
070921\07kol_4_07092021_5.jpg
फोटो नं. ०७०९२०२१-कोल- मिर सरफराज अली (आरोपी)