थॅलेसेमिया रूग्णांचे कोल्हापुरात औषधाविना हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 03:44 PM2020-07-17T15:44:28+5:302020-07-17T15:45:59+5:30
कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थॅलेसेमिया रूग्णांचे औषधे व तपासणीविना हाल होत आहेत. त्याबाबत फाईट ॲगेन्स्ट थॅलेसमिया असोसिएशनने सीपीआर प्रशासनाकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली. जिल्हयात या आजाराचे २५० रुग्ण आहेत.
कोल्हापूर : येथील सीपीआर रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थॅलेसेमिया रूग्णांचे औषधे व तपासणीविना हाल होत आहेत. त्याबाबत फाईट ॲगेन्स्ट थॅलेसमिया असोसिएशनने सीपीआर प्रशासनाकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली. जिल्हयात या आजाराचे २५० रुग्ण आहेत.
थॅलेसेमिया हा रक्ताशी निगडित गंभीर आजार असून रूग्णांच्या अंगात जन्मतःच रक्त तयार होत नाही. प्रत्येक २१ दिवसांनी रक्ताची पिशवी चढवावीच लागते. रक्त संक्रमणाने होणारे धोके टाळण्यासाठी महिन्यातून तपासणी करावी लागते. रूग्णांना रोज न चुकता औषधे घ्यावीच लागतात. त्याची मोफत औषधे फक्त जिल्हा रूग्णालयातच मिळतात पण गेल्या तीन महिन्यांपासून सीपीआर प्रशासनाकडून थॅलेसेमिया रूग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. रूग्णांचे जीवन अवलंबून आहे, अशी औषधे देण्यात टाळाटाळ होत आहे.
सीपीआरमध्ये कोल्हापूरसह कर्नाटक आणि सांगली जिल्ह्यातील रूग्णांची नावेदेखील नोंद आहेत. तिकडच्या रूग्णांचे पालक औषधे नेण्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था करून येतात, पण अपघात विभागातील डॉक्टर त्यांना सीपीआरमध्ये औषधे नसल्याचे सांगून कसबा बावड्यातील सेवा रूग्णालयात पाठवतात. तिथे हेच कारण दिले जाते. हेलपाटे मारून अखेर हताशपणे रूग्णांचे पालक रिकाम्या हाती गावी परतत आहेत
प्रमुख मागण्या
- थॅलेसेमिया रूग्णांसाठी सेवा रूग्णालयात तात्पुरता स्वतंत्र वॉर्ड सुरू करा, रक्त संक्रमणाची व्यवस्था तिथेच करा
- हिमॅटोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. वरूण बाफना यांची सेवा रूग्णालयात आठवड्यातून एकदा ओपीडी सुरू करा.
- सीपीआरमध्ये थॅलेसेमिया रूग्णांसाठी भरपूर औषधे शिल्लक आहेत याची कल्पना अपघात विभागातील डॉक्टरांना द्या
- औषधे सेवा रूग्णालयात देण्याचीही व्यवस्था करा
मग ही औषधे आली कोठून..
सीपीआरमधील औषध स्टोअरमध्ये १५ थॅलेसेमिया रूग्णांच्या कार्डच्या झेरॉक्स दाखवून गोळ्यांचे बॉक्स घेऊन जाताना एक व्यक्ती बुधवारी दिसली. रूग्णाचे पालकांना गोळ्या देण्यास टाळाटाळ आणि एकाच व्यक्तीला १५ रूग्णांसाठीची औषधे दिली जातात. ती त्या रूग्णांपर्यंत पोहोचतात तरी का, याची चौकशी सीपीआर प्रशासन करावी, अशी मागणी नामजोशी यांनी केली आहे.