थॅलेसेमिया सेंटर सुरू होण्याआधीच पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:54 AM2019-05-11T11:54:33+5:302019-05-11T12:02:35+5:30
रक्तातील आनुवंशिकतेमुळे होणारा थॅलेसेमिया आजार हळूहळू पाय पसरत असताना, त्याच्या प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या सेंटरनाच आता कुलूप लागण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाकडून सेंटर मंजूर झाली; पण त्यासाठी लागणारी साधने व मनुष्यबळाची उपलब्धताच करून दिलेली नसल्यामुळे याचे नुसतेच सांगाडे उभे राहिले आहेत.
नसिम सनदी
कोल्हापूर : रक्तातील आनुवंशिकतेमुळे होणारा थॅलेसेमिया आजार हळूहळू पाय पसरत असताना, त्याच्या प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या सेंटरनाच आता कुलूप लागण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाकडून सेंटर मंजूर झाली; पण त्यासाठी लागणारी साधने व मनुष्यबळाची उपलब्धताच करून दिलेली नसल्यामुळे याचे नुसतेच सांगाडे उभे राहिले आहेत.
कोल्हापुरात तर सात लाख रुपये खर्चून सेवा रुग्णालयातच तयार केलेले हे सेंटर बंदच असल्यामुळे हा सर्व खर्च वाया गेला आहे. केंद्र सरकारने मनावर घेतले तरीदेखील पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
आनुवंशिक आणि जन्मजात आजार म्हणून थॅलेसेमियाकडे पाहिले जाते. लाल पेशी कमी होऊन शरीरातील हिमोग्लोबिन तयार होण्याची प्रक्रियाच थांबते. या आजाराची लागण झाल्यास रुग्ण जास्तीत २५ ते ३० वर्षेच जगू शकतो. देशभरात दरवर्षी या आजाराशी संबंधित १० हजार रुग्ण आढळतात.
एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २०० च्या वर रुग्ण आढळून आले आहेत. महागडे उपचार, रक्ताची अनियमित उपलब्धता, बरे होण्याची संभावना कमी असल्याने प्रबोधनावर अधिक भर देणे महत्त्वाचे ठरत असल्यानेच केंद्र सरकारने डे केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार कोल्हापुरात कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील एका हॉलमध्ये पार्टिशन तयार करून त्याचे रूपांतरण सेंटरमध्ये करण्यात आले. त्यासाठी मंजूर झालेल्या आठ लाखांच्या निधीपैकी सात लाख खर्च करण्यात आले. या घटनेलाही आता दीड वर्ष होऊन गेले आहे; तथापि आतापर्यंत येथे कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्या होताना दिसत नाहीत.
या संदर्भात याच्यासंबंधित घटकांशी संपर्क साधला असताना कोणी उघडपणे बोलण्यासही तयार नाहीत. हे सेंटर सुरू करायचे तर रक्ताची उपलब्धता आणि त्याची तपासणी करण्यासाठी अद्ययावत लॅबची गरज आहे, शिवाय हेमॅटॉलॉजिस्टची अत्यंत गरज आहे; पण शासनाकडून सेंटरचा सांगाडा उभा करण्यापलीकडे गेल्या दीड वर्षात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. कर्मचारी भरती आणि साधनसामग्रीच्या बाबतीत ब्रही काढला गेलेला नाही.
रुग्णांसाठी उपयुक्तच
हिमोग्लोबिनचे प्रमाण नऊ टक्क्यांच्याही खाली गेले तर औषधे व रक्त चढवून प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला तरी ते फार काळ टिकत नाही. त्यामुळे दर सहा आठवड्यांनी अशा रुग्णांना रक्त चढवावे लागते. शिवाय हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफरेसिसच्या तपासणीसह बोन मारो ट्रान्स्प्लान्ट शस्त्रक्रियाही करावी लागते.
हे उपचार खूपच महागडे असतात. शासनाकडून हे सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केले तर अशा प्रकारच्या रुग्णांवर वेळीच उपचार व तपासण्या होऊन त्यांचे आयुर्मान पाच ते १० वर्षांनी वाढविणे शक्य आहे.
राज्यात १८ सेंटर्स
राष्ट्रीय बालस्वास्थ्य अभियानांतर्गत एकट्या महाराष्ट्रात १८ सेंटर सुरू केली, त्यात सातारा, ठाणे, नाशिक, मुंबई,अमरावती येथे प्रत्यक्षात त्यांची सुरुवात झाली. याशिवाय कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड या १० ठिकाणी जिल्हा रुग्णालयातच हे सेंटर उभारण्याच्या सूचना दिल्या.