टेंबलाईवाडीकरांची तहान भागणार कधी ?
By admin | Published: February 9, 2015 12:18 AM2015-02-09T00:18:36+5:302015-02-09T00:36:57+5:30
कही खुशी कही गम : अंतर्गत रस्ते उत्तम, पण अवेळी येणाऱ्या पाण्याने महिला हैराण
कोल्हापूर : टेंबलाईवाडी हा शहराच्या पूर्वेकडील मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांची वस्ती असलेला प्रभाग होय. मुबलक पाणी व चांगले रस्ते अशी माफक अपेक्षा स्थानिक नागरिकांची आहे. विद्यमान नगरसेविका रोहिणी काटे यांनी अंतर्गत रस्त्यांची कामे ९० टक्के पूर्ण केली आहेत. कचरा उठाव व स्वच्छ गटारी यामुळे त्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत असले तरी पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी असून प्रभागाची तहान कधी मिटणार, हा प्रश्न आहे.
प्रभागात सम्राट कॉलनी, जोशी गल्ली, अष्टविनायक कॉलनी, साईनाथ कॉलनी, श्रीराम कॉलनी, कृष्णविहार कॉलनी, टेंबलाईवाडी गावठाण असा भाग येतो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी टेंबलाईवाडीतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वेळेला ‘रास्ता रोको’सारखी आंदोलने केली आहेत. पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी येथील स्थानिक प्रतिनिधींकडे नागरिकांनी कित्येकवेळा मागणी करूनसुद्धा याकडे दुर्लक्ष झाले आहे. काटे यांनी काही गल्ल्यांमध्ये पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे.
प्रभागातील काही भागात पाणी येते. पण ते पहाटे चार वाजता येते. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. पाणी येते ते देखील कमी दाबाचे असते. जेवढे पाणी आहे तेवढे भरण्यासाठी पहाटे उठले नाही तर सहा वाजता पाणी जाते. त्यामुळे दिवसभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. हे पाणी सकाळी सहा किंवा सात वाजता सोडावे अशी कित्येक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे; मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काही भागांत पाणीच येत नसल्याने येथील अनेक नागरिकांनी बोअरिंग मारले आहेत.
प्रभागातील अनेक रस्त्यांनी डांबर पाहिले नव्हते. मात्र नगरसेविका काटे यांनी याची दखल घेत अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांची कामे करून येथील रस्ते चकचकीत केल्याने नागरिकांमधून समाधान, गटारीची कामेही केल्याने सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ठिकाणी गटारी साफ करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी वेळच्या वेळी येत असल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होते. प्रभागात नगरसेविकांची फेरी असल्याने कचरा उठाव वेळच्या वेळी केला जातो. घंटागाडीची सेवादेखील उत्तमरित्या सुरू आहे. तसेच प्रभागातील काही समस्यांबाबत नगरसेविका तत्काळ भेटत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पण समाधानाचे हे चित्र काही भागातीलच आहे. उचगाव हद्द येथील लक्ष्मी कॉलनी येथे सरकारी शौचालय वेळच्या वेळी साफ केले जात नसल्याने नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शौचालयासमोरील उचगाव हद्दीत जाणाऱ्या रस्त्यावरूनच ड्रेनेजचे पाणी ओसंडून वाहात असते. वाहनधारक त्यातूनच आपली वाहने दामटत असतात. हा रस्ता महापालिकेचा की उचगाव ग्रामपंचायतीचा? याबाबत दोघांचेही दुर्लक्ष झाले असून, येथे दलदल झाली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी साचलेल्या पाण्यातच मुले खेळत असतात.
प्रभागातील पावणेदोन कोटींची कामे करण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्यावतीने कमी पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागात पाणी देताना चांगलीच तारांबळ उडते. हा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन मोटार बसवून येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. रस्त्यांची व ड्रेनेज पाईपपाईनची कामे पूर्ण केली आहेत. - रोहिणी काटे, नगरसेविका