अंबाबाई मंदिर प्रवेशावरून रंगणार श्रेयवाद

By admin | Published: April 11, 2016 12:24 AM2016-04-11T00:24:28+5:302016-04-11T00:35:44+5:30

समन्वय बैठक आज : स्थानिक गर्भकुडी प्रवेशावर ठाम; कोल्हापुरातील शांतता ‘बाहेर’च्यांकडून भंग न होण्याबाबत दक्षता

Thank you for playing the Ambabai temple | अंबाबाई मंदिर प्रवेशावरून रंगणार श्रेयवाद

अंबाबाई मंदिर प्रवेशावरून रंगणार श्रेयवाद

Next

कोल्हापूर : शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरातही अंबाबाई मंदिराच्या गर्भकुडीत जाऊन महिलांनी दर्शन घेण्याचे भूमाताच्या तृप्ती देसाई यांनी जाहीर केले; पण यावरूनच ‘स्थानिक आणि बाहेरील’ असा श्रेयवाद रंगला आहे. यातून कोल्हापूरच्या शांततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.
बाहेरून येऊन कोणीही आंदोलन केले तर कोल्हापूरची शांतता भंग होईल, बदनामी होईल, यामुळे स्थानिक महिलांना आजच मंदिर गाभाऱ्यात प्रवेश देऊन देवीची ओटी भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक स्त्री-पुरुष समता समिती आणि अंबाबाई भक्त मंडळाने जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे केली. त्यावर आज, सोमवारी होणाऱ्या मंदिर शांतता समिती बैठकीत निर्णय घेण्याबाबत देशमुख यांनी सुचविले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबतही उद्या, मंगळवारी बैठक होणार आहे.
तृप्ती देसाई या आंदोलनाचे श्रेय घेणार याची जाणीव झाल्याने स्त्री-पुरुष समता समिती व अंबाबाई भक्त मंडळांनी रविवारीच गर्भकुडीत प्रवेश देण्याचे अचानक जाहीर केले. त्यांनी पोलिस संरक्षणाचीही मागणी केली. श्रीपूजकही राजवाडा पोलिस ठाण्यात हजर होते.
श्रीपूजकांतर्फे नगरसेवक अजित ठाणेकर, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, माधव मुनीश्वर, सुरेश जरग, तर भक्त मंडळातर्फे प्रा. आशा कुकडे, मीना चव्हाण, रूपाली कदम, डॉ. मीनल जाधव, स्नेहल कांबळे, आशा बरगे, शरयू भोसले, सुवर्णा तळेकर, आरती रेडेकर, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, गिरीष फोंडे, मुकुंद कदम, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठविणार
श्रीपूजकांविरोधात याचिका : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडची माहिती
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरातील गाभारा प्रवेशाबाबत कार्यवाही न करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. त्यासह वज्रलेपावेळी करवीरनिवासिनी अंबाबाईदेवीच्या मूर्तीची मोडतोड करणाऱ्या श्रीपूजकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
मंदिर प्रवेशाबाबत आज, सोमवारी आणि बुधवारी (दि. १३) होणाऱ्या आंदोलनाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे, अशी माहिती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर सुर्वे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
सुर्वे म्हणाले, सर्व समाजातील महिलांना करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करणे जिल्हा प्रशासनाचे कर्तव्य आहे. शिवाय प्रशासनाला त्याची सक्ती आहे. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कार्यवाही केली नाही. यातच गाभाऱ्यात प्रवेश करण्यावरून गेल्या आठवड्यात भाविक महिलांना पोलिसांच्या साक्षीने धक्काबुक्की झाली. शिवाय संबंधित महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. यातून एक प्रकारे न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना ब्रिगेडतर्फे नोटीस पाठविण्यात येणार आहे.
श्री अंबाबाईदेवीच्या मूर्तीवर व्रजलेप करताना देवीच्या मस्तकावरील नाग चिन्ह श्रीपूजकांनी नष्ट केले आहे. काही वर्षांपूर्वी सिंहदेखील गायब केला आहे. तसेच व्रजलेपावेळी मूर्तीला तब्बल चार किलो एमसील लावले आहे. अशा पद्धतीने मूर्तीची मोडतोड केल्याबाबत श्रीपूजकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार
आहे. या पत्रकार परिषदेस ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष उमेश पोवार, शहराध्यक्ष नीलेश चव्हाण, प्रताप पाटील, रणजित चव्हाण, विजय पाटील, जितेंद्र पाडेकर, अमोल परीट, प्रवीण राजीगिरे, अनिकेत सावंत, किरण पोवार, शार्दूल शिंदे उपस्थित होते. +


समन्वयाचे आवाहन : स्त्री-पुरुष समता समिती, अंबाबाई भक्त मंडळ व मंदिर शांतता समितीत चर्चा

मंदिर प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची जिल्हाधिकारी जी बैठक घेणार आहेत त्यानंतर प्रवेशाचा निर्णय घ्यावा, ज्या-ज्या महिला संघटना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहेत, त्या सर्वांनी एकाच दिवशी प्रवेश करावा, असे ठरविण्यात आले.
यावर भक्त मंडळातर्फे अंबाबाईच्या दर्शनाला गर्भकुडीत सामान्य महिलांना अटकाव केला जातो; मात्र राजघराण्यातील स्त्रिया व पुजाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना व इतर पुरुषांना गर्भकुडीत प्रवेश दिला जातो. हा भेदभाव आहे. त्यामुळे आताच देवीच्या गर्भकुडीत जाऊन दर्शन घेऊ, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी भूमिका पोलिस ठाण्यात या आंदोलकांनी घेतली.
यावर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी सर्वांना करावीच लागणार आहे, आंदोलनकर्त्यांनी गडबड करू नये. मंदिर शांतता समितीशी बैठक घेऊन चर्चा करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले. यात श्रीपूजक, मंदिर व्यवस्थापन, पोलिस प्रशासनाचा प्रतिनिधींचा समावेश असावा, असे ठरविण्यात आले.


संविधानाने दिलेल्या हक्कानुसार महिला कुठल्याही परिस्थितीत करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून दर्शन घेण्यावर ठाम आहेत. कोल्हापूरची शांतता भंग होऊ नये अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे.
- सतीशचंद्र कांबळे
मंदिर प्रवेशाचा वाद पेटता राहू नये. यातून कोल्हापूरची बदनामी होऊ नये, इतकीच अपेक्षा आहे. श्रीपूजकांनी या प्रवेशासंबंधी आडकाठी करूनये, त्यामुळे त्यांनाही टार्गेट करूनये. गाभारा छोटा आहे. या सर्व वस्तुस्थितीचाही विचार करावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्या, मंंगळवारी यावर मार्ग काढावा.
- अ‍ॅड. केदार मुनीश्वर श्रीपूजक, अंबाबाई देवी

यावेळी झालेल्या बैठकीत गाभाऱ्यात कशाप्रकारे प्रवेश करता येईल, यासह अन्य बाबींवरही चर्चा करावी, जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य करावा व हाच निर्णय
उद्या, मंगळवारी होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतही कायम ठेवू, असे ठरले.
त्यानुसार आज, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मिरजकर तिकटी नजीक विठ्ठल मंदिर येथे शांतता समिती व भक्त मंडळाचे सदस्यांची बैठक घेण्याचे मान्य केले. यात जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल, असे निश्चित करण्यात आले.
आठवड्यापूर्र्वी अनुराधा भोसले यांनी अंबाबाईच्या गर्भकुडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही मंगळवारी गर्भकुडीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्याला ‘रणरागिणी’ संस्थेने विरोध केला आहे. त्यामुळे हा वाद सध्या वाढतो आहे.

Web Title: Thank you for playing the Ambabai temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.