सहाशे फुटांची दरी पार करण्याचा ‘थरार ’
By admin | Published: January 17, 2016 12:52 AM2016-01-17T00:52:12+5:302016-01-17T00:56:52+5:30
साहसी व्हॅली क्रॉसिंग : विशाळगड येथे वेस्टर्न माऊंटन स्पोर्टस् व हिल रायडर्स गु्रपचा उपक्रम, पहिल्या दिवशी ५० जणांचा सहभाग
सचिन भोसले ल्ल कोल्हापूर
खाली पाहिले तर कोणालाही डोळे गरगरायला लावील अशी खोल दीड हजार फूट दरी आणि कड्यावरून पाहिले असता जमिनीवरील माणूस मुंगीएवढा दिसतो. अशा थरारक वाटणारे साडेसहाशे फूट लांबीचे अंतर, तेही दरीवरून अगदी ५५ ते ६० सेकंदांत पार करायचे अशा साहसपूर्ण खेळाचा थरार शनिवारी पन्नासहून अधिकजणांनी अनुभवला.
अशा या साहसी थरारक झीप लाईन (व्हॅली क्रॉसिंग)चे आयोजन पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच वेस्टर्न माउंटन स्पोर्टस व हिल रायडर्स गु्रपच्या वतीने स्वर्गीय गिर्यारोहक कार्तिक कांबोजच्या स्मरणार्थ शनिवारी विशाळगडावर केले होते. तीनदिवस हा उपक्रम होणार आहे.
‘झिप लाईन’ गिर्यारोहणातील मोठ्या अंतराची दरी पार करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रकार आहे. दरीच्या दोन्ही बाजूंना दोर बांधून घ्यायचे. जेथून सुरुवात करावयाची ती बाजू उंचावर आणि जिथे उतरणार ती बाजू तिरक्या बाजूला निश्चित करावयाची. गुरुत्त्वाकर्षणाच्या नैसर्गिक शक्तीचा वापर करून ती दरी पार (व्हॅली क्रॉस) करावयाची. यामध्ये विशाळगडावरील प्रभानवल्लीकडील १५०० फूट खोलीच्या दरीवरून ६५० फूट लांबीच्या दोरावरून दरी पार करावयाची असते.
साहसी खेळ म्हटले की, धोका, धाडस हे ओघाने आलेच. अशा साहसी खेळांत सहभागी गिर्यारोहकांना प्रथम ‘झिप लाईन’ पार करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांच्या वावरण्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. सुरुवातीस प्रभानवल्लीकडील दरी पाहिल्यानंतर या गिर्यारोहकांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त भाव दिसत होते. हवेतून दिसणारा दोर बारीक दिसत होता. उत्साहाने आलेले गिर्यारोहक काही क्षण कडा पार करण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर तेथेच काही काळ रेंगाळत उभे होते. ज्याचा नंबर लागेल तो दुसऱ्याला ‘तू आधी जा’ म्हणून पाठीमागे सरत होता. विशाळगडच्या पायथ्याजवळून वर प्रभानवल्लीकडे पायऱ्या चढून येण्यासाठी गिर्यारोहकांना २५ मिनिटे लागत होती. येथे आल्यानंतर त्यांच्या कमरेभोवती हारनेस बांधला जात होता. कॅराबिनर्स अडकविले जात होते. लढाईसाठी योद्धा तयार होतो तसा गिर्यारोहक अस्त्रे, शस्त्रे घालून सहभागी होत असल्याचे चित्र होते. या ठिकाणी अनुभवी प्रशिक्षक त्या गिर्यारोहकाने सुरक्षा साधने घातली आहेत की नाही, याची तपासणी करीत असे. त्यानंतर त्याला खाली सोडले जात होते. या अनुभवाबद्दल गिर्यारोहकाला विचारले असता, ‘प्रथम काही सेकंद भीती वाटत होती. खाली पाहिल्यानंतर माणसे अगदी मुंगीएवढी दिसत होती. आम्ही जसजसे कड्याच्या दुसऱ्या उतरत्या बाजूला जात होतो, तसे खालून आम्हाला शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून आमचे मित्र, संयोजक प्रोत्साहित करीत होते,’ असा अनुभव अनेकांनी सांगितला.
अशा या साहसी उपक्रमासाठी विनोद कांबोज, प्रमोद पाटील, मेहबूब मुजावर, युवराज साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली परेश चव्हाण, सतीश यादव, विनायक कालेकर, मयूर लवटे, उपेंद्र क्षीरसागर, अमीर नदाफ, प्रताप माने, सुनील लोहार या गिर्यारोहकांच्या पथकाने उत्कृष्ट नियोजन केले होते. या सर्वांना खुशी कांबोज, स्नेहल रेळेकर, पी. जी. जाधव, शिवतेज पाटील, हृषिकेश पोवार, डॉ. सर्जेराव पाटील, दिनकर कांबळे, अजित कपडे, चंदन मिरजकर, अवधूत भांडवलकर, प्रमोद माळी, वैष्णवी कांबळे हेही साहाय्य करीत होते.
आपत्कालीन कौशल्य
आपत्कालीन व्यवस्थापनेत या व्हॅली क्रॉसिंगच्या कौशल्याचा उपयोग मोलाचा ठरेल. इमारतींना लागलेल्या आगी, दरीत उतरणे, पूर, विहिरीत उतरून अपघातग्रस्थांना मदत करणे, रेस्क्यू मोहीम यशस्वी करण्यास येथील कौशल्य सोयीस्कर ठरू शकेल, असे विनोद कांबोज व युवराज साळोखे यांनी सांगितले. साहसी पर्यटनासाठी शासनाने जर या प्रस्तावाला मंजुरी दिली, तर या मोहिमेचे पालकत्व घेण्याची तयारी हिल रायडर्स व समिट अडव्हेंचरने दर्शवली आहे.
झिप लाईन : पर्यटनातील अनोखी क्रेझ
1आंबा : सह्याद्रीचा पश्चिम घाट नि पर्यटन म्हटले की निसर्ग, जैवविविधता व ऐतिहासिक वारसा या पर्यटनाची संपन्नता सह्याद्रीच्या रांगेतून विसावलेली दिसते. झिप लाईन (व्हॅली क्रॉसिंग) ही संकल्पना कोल्हापूरच्या साहसी पर्यटनात मोलाची भर टाकणारी ठरत आहे. राधानगरी असो की चांदोली अभयारण्य असो, जंगल भ्रमंती ही येथील साहसी पर्यटनाची क्रेझ. हिल रायडर्स ग्रुपचे प्रमुख प्रमोद पाटील व विनोद कांबोज यांनी पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती, रोप क्लार्इंबिंग यातून निसर्ग व इतिहासप्रेमींना पर्यटनाकडे वळवले आहे. तरुणांनी साहसी पर्यटनाकडे वळावे व सह्याद्रीवरील जैवविविधता व गडकोटाचा ठेवा जपावा म्हणून झीप लाईन ही अक्टिव्हिटी होत आहे. गडाकडे लोक आकर्षित व्हावेत व इतिहास जपला जावा हा मुख्य हेतू या मोहिमेचा असून, ही थिम येथील निसर्ग पर्यटनाला नवा आयाम देणार असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी स्पष्ट केले.
2स्वराज्यातील सर्वांत विशालमय व बाजीप्रभूंच्या पराक्रमाने पावन झालेला विशाळगडचा पायथा व माचाळ खिंड व्हॅली क्रॉसिंगला पूरक आहे. याशिवाय आंबाघाट, गगनबावडा, रांगणा, आजरा, मसाई पठार, आंबोली येथील सह्यकडे हा थरार व साहसपण ताकदीने जपणारे आहेत.