Kolhapur: 'तो' व्हिडीओ कळंबा कारागृहातील नव्हे! कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:19 PM2023-12-23T12:19:39+5:302023-12-23T12:19:58+5:30
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील फोटोसह गुरुवारी व्हायरल ...
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील फोटोसह गुरुवारी व्हायरल झालेला मूळ व्हिडीओ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याच कारागृहातील नसल्याचे शुक्रवारी चौकशीत स्पष्ट झाले. हा व्हिडीओ भोपाळ कारागृहातील असल्याचे पुढे आले आहे.
हा व्हिडीओ कुणीतरी खोडसाळपणाने कळंबा कारागृहातील असल्याचे भासवून व्हायरल केला. तरीही कारागृहात कैद्यांना मोबाइल मिळू नयेत यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचे कारागृह प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
राजेंद्रनगरातील गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये खून झाला. त्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित माने याच्यासह चौघे कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. माने गेले १३ महिने कारागृहात आहे. त्याचा जामीन अर्ज येत्या १ जानेवारीला जिल्हा न्यायालयासमोर येणार आहे. त्याला जामीन मिळू नये यासाठी त्याच्या विरोधकांनी भोपाळ कारागृहातील हा मूळ ४४ सेकंदांचा व्हिडीओ घेऊन त्यातील स्क्रीनशॉट काढून ते व्हायरल केल्याचे माने याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ही बाब त्यांनी कळंबा कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.