..त्यामुळेच पवार कुटुंबियांवर टीका, रोहित पवारांनी साधला विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 06:02 PM2023-01-27T18:02:50+5:302023-01-27T18:03:21+5:30
पहाटेच्या शपथविधी बाबतही नेमकं काय घडलं या विषयी अजितदादा आणि शरद पवाराच सांगू शकतील.
रमेश पाटील
कसबा बावडा (कोल्हापूर) : राज्यात कोणतीही घटना घडली की त्याचा संबंध शरद पवारांशी जोडला जातो. पहाटेच्या शपथविधी बाबतही नेमकं काय घडलं या विषयी ते अजितदादा आणि शरद पवाराच सांगू शकतील. यातील मला काही माहीत नाही. मात्र सद्या काहींना मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांवर बोलण्याचे उद्योग सुरू आहेत. केवळ प्रसिद्धी मिळण्यासाठी पवार कुटुंबियांवर नेहमीच टीका केली जाते असे सांगत राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आमदार रोहित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्र व्हिजन फोरम या चळवळी विषयी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी राजकीय टोलीबाजी केली.
लोकसभा, विधानसभा एकत्र होण्याची चिन्हे आहेत असे सांगून पवार म्हणाले, सध्या भाजपची पीछेहाट होत आहे. अनेक निवडणुकांमध्ये त्याचा त्यांना प्रत्यय आला आहे. राजकारणात घराणेशाही वर बोलले जाते. राजकारणात घराणेशाही अडथळा ठरते हे मान्य आहे. परंतु काम करणाऱ्या नव्या पिढीला पार्टीने संधी दिली पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, स्पर्धा परीक्षा जुन्या पद्धतीने घ्या यासाठी शरद पवार देखील आग्रही आहेत. इतकच नाही तर २०२५ ला स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमत बदल होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद
'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत 1 लाख लोकांनी मतदान केलं असून 24 हजार लोकांनी सल्लाही दिला आहे. यामधून व्हीजन डाॅक्युमेंट आम्ही सरकारला देणार आहे, असंही पवार म्हणाले. फेब्रुवारी अखेरीस 10 लाख मतदान होईल. हा प्रकल्प ऑनलाइन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवर सरकारने काम करावं, असंही पवार म्हणाले.