रसिक आहेत म्हणूनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:42 PM2019-09-02T23:42:15+5:302019-09-02T23:42:19+5:30

भारत चव्हाण माणसाचं नशीब कधी फळफळेल सांगता यायचं नाही. नशिबात असेल तर राजयोगसुद्धा जुळून येतो आणि जर तुमच्या नशिबात ...

That's why it's fun! | रसिक आहेत म्हणूनच!

रसिक आहेत म्हणूनच!

googlenewsNext

भारत चव्हाण
माणसाचं नशीब कधी फळफळेल सांगता यायचं नाही. नशिबात असेल तर राजयोगसुद्धा जुळून येतो आणि जर तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नसेलच तर कितीही आपटलं तरी काही साध्य होत नाही. अलीकडील काळात शिकलेले तरुण नशिबापेक्षा स्वत:च्या कर्तृत्वाला महत्त्व देतात. स्वत:च्या कर्तृत्वाने, जिद्दीच्या जोरावर नशीब घडविण्याची भाषा करतात. त्यात तथ्यही आहे. जिद्दीच्या जोरावर यश मिळतं, तुमचं करिअर घडतं; परंतु त्याकरिता बरेच कष्ट उपसावे लागते. रातोरात सर्व काही मिळवता येत नाही. यशाची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. पण, जर तुमचं नशीब चांगलं असेल तर कर्तृत्वशून्य असतानाही बरंच काही मिळतं. अनेकदा आपण म्हणतो ‘बघा, कर्तृत्व काहीच नाही; पण बरंच काही मिळालं. त्याचं नशीबच चांगलं आहे.’ समाजात आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. कोणी रातोरात श्रीमंत होतं, कोणी प्रसिद्धीच्या झोतात येतं, कोणाला लॉटरी लागते. कोणाला आणखी काही.... ज्यांच्याकडे ३५ खासदार नव्हते, असे एच. डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांचा राजयोग चांगला होता; पण ज्यांनी भारतीय जनता पक्षाला देशपातळीवर नेऊन ठेवले, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणून दिले, एकेकाळी भाजप म्हणजे अटलबिहारी-लालकृष्ण अडवाणी असंच समीकरण होतं; पण सत्ता यायची वेळ जवळ आली तेव्हा त्यांना ज्येष्ठांच्या यादीत स्थान मिळाले. याचाच अर्थ त्यांचं कर्तृत्व ९९ टक्के होते; पण एक टक्का नशीब त्यांच्यासोबत नव्हतं.
राणू मंडल नावाच्या महिलेचं नशीब असंच रात्रीत फळफळलं. तिलाही वाटलं नसेल की आपण कधीतरी अशा प्रसिद्धीच्या झोतात येऊ आणि देशभर आपलं नाव होईल! पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वेस्थानकावर गाणं म्हणत भिक्षा मागून पोट भरणारी ही महिला. आख्ख्या खानदानात कोणी गायक नाही अशी राणू आपल्या सुरेल गायनाने कुठल्या कुठं जाऊन पोहोचली आपण पाहतोय. रोज रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या राणूला कोणी कानसेन पैसे देऊन तिच्यातील कलेला प्रतिसाद देत होता. मुंबईत राहणारी ही महिला पतिनिधनानंतर पश्चिम बंगालमध्ये जाते आणि उदरनिर्वाह म्हणून रेल्वेस्थानक हेच निवासस्थान समजून तेथेच राहते. अशा या राणूला एक दिवस मोठी प्रसिद्धी मिळेल, मोठी संधी मिळेल, असे भविष्य कुणी सांगितले असते तर त्याला लोकांनी चक्क खुळ्यात काढले असते! पण, अशी संधी मिळण्याचा राजयोग तिच्या नशिबानं लिहून ठेवला होता. वेळ येताच नशीब फळफळलं. एतिंद्र चक्रवर्ती नावाच्या रसिक व्यक्तीने तिच्या गाण्याचा व्हिडीओ बनविला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. रूप नाही, रंग नाही, अंगावर चांगले कपडे नाहीत, अशा राणूला बघता-बघता लाखो लाईक्स, कॉमेंट्स मिळाल्या. तसं संगीत व गायन क्षेत्रात नामवंत असलेल्या कलाकारांचे तिच्याकडे लक्ष वेधले. जणू दुसरी लता मंगेशकर मिळाल्याचा साक्षात्कार झाला.
राणू मंडलच्या गाण्याचे तसेच तिच्या जीवनावर आधारित शेकडो व्हिडीओंनी सोशल मीडियावर, यू ट्युबवर धुमाकूळ घातला आहे. हिमेश रेशमियाने तर तिच्याकडून आपल्या अल्बममधील एक गाणे गाऊन घेतले आहे. तिच्या आवाजाची खात्री झाल्यामुळे तिला अनेक आॅफर्स येऊ लागल्या आहेत. कर्तृत्व काहीच नसताना नशिबाची साथ तिच्यासोबत होती म्हणूनच हे घडलं; परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की, एक कलाकाराला दुसरा कलाकार भेटला आणि त्याचं कौतुक केले याला महत्त्व आहे. हिमेश जर पुढे आला नसता, तर येणाºया शेकडो व्हिडीओंमधील एक म्हणून तोही डिलिट झाला असता.
कलाकाराचं कौतुक तितक्याच संवेदनशील असलेल्या कलाकाराकडूनच होत असतं. आपल्याला आठवत असेल, कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार शरद वायकूळ यांचा नावलौकिक देशभर झाला. वायकूळ सरांनी एकदा मुंबईतील जहॉँगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. अनेकांनी प्रदर्शन पाहिलं, कौतुक केलं. असाच एक अवलिया प्रदर्शन बघायला आला. त्यांनी वायकूळ सरांची चित्रे निरखून पाहिली, त्यांतील जिवंतपणा पाहिला. त्यांनी नम्रपणे आपली ओळख सांगितली. दुसºया दिवशी त्यांनी सरांना सपत्नीक बंगल्यावर बोलावले. चहापाणी झाले. दुपारचे जेवणही झाले. निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा त्या अवलियाने सरांना एक नवा सूट भेट दिला. दहा हजार रुपये हातांवर ठेवले तेव्हा वायकूळ सर खूपच भारावून गेले. तो अवलिया होता जगप्रसिद्ध गायक महंमद रफी! एका कलाकाराने दुसºया कलाकाराचे केलेले हे कौतुक भावस्पर्शी होते. पारख करणारे रसिक आहेत म्हणूनच कलाकार आणि कला जिवंत आहे.

Web Title: That's why it's fun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.