रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात होणार
By उद्धव गोडसे | Updated: May 21, 2024 16:46 IST2024-05-21T16:45:37+5:302024-05-21T16:46:09+5:30
शिवभक्तांनी सहभागी व्हावे ; संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन

रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात होणार
कोल्हापूर : रायगडावर ५ व ६ जूनला ३५० वा शिवराज्याभिषेकाचा सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीची वज्रमूठ बांधत सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे केले. पुणे येथील ऑल इंडिया श्री छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये आयोजित शिवराज्याभिषेकाच्या पूर्व नियोजनाच्या राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, ‘शिवराज्याभिषेकास यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्त पाळून गडावर यावे. समितीतर्फे गडावर येणाऱ्या शिवभक्तांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिवराज्याभिषेक लोकोत्सव झाला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवभक्तांचा गडावर ओघ वाढत आहे. देशाच्या अन्य राज्यांतून शिवभक्त गडावर दाखल होत आहेत. नेहमीप्रमाणे यंदाचाही शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटात आणि अविस्मरणीय होईल.’
संयोगिताराजे म्हणाल्या, ‘समितीतर्फे विविध समित्या स्थापन केल्या असून, त्यातील कार्यकर्त्यांनी शिवभक्तांना मदत करावी. होळीच्या माळावर गर्दी नियंत्रित ठेवताना समितीच्या सदस्यांचा कस लागतो. शिवभक्तांकडून आलेल्या सूचनांचा आदर ठेवून, त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल.’
नियोजन बैठकीस फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, सचिव अमर पाटील, विनायक फाळके, प्रवीण पवार, प्रवीण हुबाळे, विकास देवळे, उदय घोरपडे, स्वराज्य प्रवक्ते धनंजय जाधव, आदी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. सदस्य अतुल चव्हाण यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी आभार मानले.