दुधाच्या वजनकाट्यातील लूट थांबणार, दूध उत्पादकांचा फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 02:36 PM2022-10-14T14:36:00+5:302022-10-14T14:36:37+5:30

सध्या ही अचूकता १०० मिलीलिटरपर्यंतची असल्याने एक ते ९९ मिलीलिटर दूध जास्त घेतले तरी त्याची नोंद होत नव्हती.

The accuracy of the electronic scales used while taking milk is now less than 10 milliliters | दुधाच्या वजनकाट्यातील लूट थांबणार, दूध उत्पादकांचा फायदा होणार

संग्रहित फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : सहकारी व खासगी दूध संस्था शेतकऱ्यांकडून दूध घेताना वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्राॅनिक वजनकाट्याची अचूकता आता १० मिलीलिटरपर्यंत कमी करण्यात आली आहे तसे आदेश राज्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी बुधवारी दिले. याची अंमलबजावणी नव्या वर्षात एक जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडने यासाठी गेली काही वर्षे पाठपुरावा केला होता. सध्या ही अचूकता १०० मिलीलिटरपर्यंतची असल्याने एक ते ९९ मिलीलिटर दूध जास्त घेतले तरी त्याची नोंद होत नव्हती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. एका शेतकऱ्याचे सरासरी ५० मिलीलिटर दूध महिनाभर वाचले तरी दीड लिटर दूध वाढू शकते. त्याचे त्याला किमान ७५ रुपये जास्त मिळू शकतील. कोल्हापूर जिल्ह्यात एकट्या गोकुळ दूध संघाचेच पाच लाखांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेड पाच-सहा वर्षांपासून आंदोलन करत आहे. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांच्या माध्यमातून दूध उत्पादकांची होत असलेली लूट थांबविणे यासाठी ब्रिगेडने २०१७ आंदोलन केले. दुधाच्या काट्याची अचूकता १०० मिलीच्या पटीत असल्यामुळे १०० मिलीपेक्षा कमी असणारे दूध हे बिनमापी दूध संस्थांच्या खात्यामध्ये जाते. ही लूट थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याकरिता वैधमापन शास्त्र विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

कोल्हापुरातील वैधमापन शास्त्र विभागाचे सहाय्यक नियंत्रक गायकवाड यांनी दूध उत्पादकांची १०० मिलीलीटरच्या निकषाने लूट होत असल्याचे कबूल केले. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी पाठपुरावा केला. शासनाने समिती स्थापन करून त्याची चौकशी केली. या समितीच्या अहवालानुसार १०० मिलीलिटरच्या पटीमध्ये दूध उत्पादक ग्राहकांची इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर फसवणूक होत असल्याची बाब समोर आल्याने वैधमापन शास्त्र विभागाकडून दुधाचे वजन-काटे सरसकट दहा मिली अचूकतेचे करण्याचे आदेश देण्यात आले. त्याची अंमलबजावणी नवीन वर्षात करण्यात येणार आहे पुढील दोन महिन्यात सर्व दूध संस्थांनी आपल्या वजनकाट्यांमध्ये योग्य ते बदल करून अचूकता दहा मिली करावी, असे न केल्यास त्यांच्यावर वैधमापन शास्त्र विभागाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशामध्ये म्हटले आहे.

फॅट तपासणीसाठी ५ मिलीच दूध..

संभाजी ब्रिगेडने यापूर्वी दुधाचे फॅट तपासण्यासाठी किती दूध घ्यावे या विषयावर यशस्वी आंदोलन केले. कोल्हापूरसह महाराष्ट्रात ५० ते १०० मिली दूध फॅट तपासणीसाठी घेतले जात होते. त्याचे प्रमाण निश्चित करण्याचे काम दुग्धविकास विभागाने केले. त्यानुसार फॅट तपासण्यासाठी फक्त पाच मिलीइतकेच दूध लागत असून अतिरिक्त दूध उत्पादकांना परत देण्याचे आदेश काढण्यात आले.

वजनकाट्यांची अचूकता दहा मिली झाल्याने लाखो दूध उत्पादकांचा फायदा होणार आहे. यंदाच्या दिवाळीला संभाजी ब्रिगेडकडून सर्व दूध उत्पादकांना ही दिवाळी भेट आहे. - रुपेश पाटील, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, कोल्हापूर

Web Title: The accuracy of the electronic scales used while taking milk is now less than 10 milliliters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.