कोल्हापूर: जयसिंगपूर पोलिसांच्या हातातून आरोपी पसार, लघुशंकेचे कारण सांगून गेला पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:34 PM2022-09-27T12:34:31+5:302022-09-27T12:34:53+5:30

मोटरसायकल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने शिताफीने केली होती अटक

The accused escaped from Jaisingpur police | कोल्हापूर: जयसिंगपूर पोलिसांच्या हातातून आरोपी पसार, लघुशंकेचे कारण सांगून गेला पळून

कोल्हापूर: जयसिंगपूर पोलिसांच्या हातातून आरोपी पसार, लघुशंकेचे कारण सांगून गेला पळून

googlenewsNext

जयसिंगपूर : चोरीच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीने जयसिंगपूर पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. प्रदीप राजेंद्र कटकोळे (वय २३, रा. आंबेडकर, हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीकामी प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यानंतर लघुशंकेचे कारण सांगून बेडी काढल्यानंतर तो पळून गेला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदीप कटकोळे याला मोटरसायकल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने शिताफीने अटक केली होती. त्याने तमदलगे, गांधीनगर येथून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली होती. त्याला जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सोमवारी त्याला जयसिंगपूर न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

दरम्यान, कळंबा जेलला नेण्यापूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी त्याला आणण्यात आले होते. यावेळी महिला पोलीस कर्मचारी, एक होमगार्ड त्याच्यासोबत होते. यावेळी त्याने लघुशंकेला जाणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याची बेडी काढण्यात आली. बेडी काढताच त्याने पळ काढला. यावेळी सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याला पकडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलीस पथकाकडून प्रयत्न सुरू होते.

मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला पकडले जाईल. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. - रामेश्वर वैंजणे, पोलीस उपअधीक्षक

Web Title: The accused escaped from Jaisingpur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.