Kolhapur: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मिरजेतून पकडले, तंबाखू मागण्याच्या कारणावरून केला होता खून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:54 PM2023-05-12T12:54:39+5:302023-05-12T12:54:57+5:30
तंबाखू न दिल्याच्या रागातून दगडाने मारहाण केली होती
कोल्हापूर : उद्यमनगर येथे पंत वालावलकर हॉस्पिटलजवळ ५ सप्टेंबर २०२२ ला झालेल्या एका व्यक्तीच्या खून प्रकरणी फरार असलेला संशयित आरोपी रोहित अजय सूर्यगंध (वय २५, रा. यादवनगर, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी बुधवारी (दि. १०) रात्री मिरजेतील एस. टी. स्टँड परिसरातून अटक केले. तंबाखू न दिल्याच्या रागातून सूर्यगंध आणि त्याच्या साथीदाराने शंकर आकाराम कांबळे (वय ४५, रा. माळापुडे, ता. शाहूवाडी) यांना दगडाने मारहाण केली होती.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या घटनेनंतर शुभम अशोक शेंडगे (वय ३३, रा. यादवनगर) हा पोलिसांच्या हाती लागला होता. त्याच्या चौकशीतून खुनाच्या कारणाचा उलगडा झाला. मात्र, गुन्ह्यातील दुसरा हल्लेखोर रोहित सूर्यगंध हा पळून गेल्याने त्याचा शोध सुरू होता.
पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सूर्यगंध हा मिरज एस.टी. स्टँडवर असल्याचे समजले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह प्रवीण पाटील आणि विशाल खराडे यांच्या पथकाने बुधवारी रात्री मिरज एस.टी. स्टँडवर सापळा रचून रोहित सूर्यगंध याला अटक केली.