कोल्हापुरातील शेतकरी संघाच्या जागेचा अखेर प्रशासनाने घेतला ताबा, नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या भाविकांची सोय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:31 PM2023-09-25T12:31:34+5:302023-09-25T12:31:58+5:30
प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर सभासदांमधून संताप
कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर्शनमंडपासह भाविकांच्या इतर सोयी सुविधांसाठी भवानी मंडप येथील शेतकरी सहकारी संघाच्या जागेवर जिल्हा प्रशासनाने रविवारी दुपारी ताबा घेतला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव तथा राधानगरीचे प्रांतांधिकारी सुशांत बनसोडे, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे, करवीरचे मंडल अधिकारी संतोष पाटील यांनी पोलिस बंदोबस्तात ताबा घेऊन तत्काळ जागेची साफसफाई केली.
नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी सुमारे दीड लाख भाविक येतात. मंदिर परिसरातच दर्शन रांगेची व्यवस्था केली जाते. मात्र, मंदिर परिसरातील मोकळा परिसर व्यापला जातो. या दरम्यान काही अनूचित घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने परिसर मोकळा असणे गरजेचे आहे.
संघाच्या तीन मजल्यावर दर्शन मंडप, स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, प्राथमिक उपचार केंद्र, इतर आवश्यक सुविधा भाविकांना द्यायच्या आहेत. यासाठी ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी दिला होता. संघाला दोन दिवस सुटी असल्याने रविवारी दुपारी जिल्हा प्रशासनाने या जागेचा ताबा घेतला. तत्काळ जागेची साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर सभासदांमधून संताप व्यक्त होत आहे. आज, सोमवारी दुपारी बारा वाजता संघाच्या भवानी मंडप येथील कार्यालयात सभासद, संघाचे माजी संचालक व कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने रविवारी कुलपे तोडून ताबा घेतला आहे. याबाबत, आज बैठक बोलावली असून, सभासद जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. - सुरेश देसाई (अध्यक्ष, अशासकीय मंडळ, शेतकरी संघ)