संविधानावरील हल्ला परतवून लावायला हवा, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत जावेद पाशांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 05:48 PM2023-01-18T17:48:07+5:302023-01-18T17:48:47+5:30
..तेव्हापासूनच संविधानाला विरोध करण्याचा खटाटोप
कोल्हापूर : देशावर आक्रमण करणाऱ्यांना सामावून घेऊन समन्वयवादी लोकशाही भारतीय संस्कृती निर्माण झाली होती, ती आज नष्ट केली जात आहे. मुस्लिमांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानावरील हिंदुत्वाचा जाणीवपूर्वक हल्ला होत आहे, तो परतवून लावला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, लेखक व प्रबोधनकार प्रा. जावेद पाशा यांनी मंगळवारी येथे केले.
येथील शाहू स्मारक भवन येथे प्रा. एन. डी. पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त हे व्याख्यान झाले. ‘भारतीय संस्कृती, सांस्कृतिक दहशतवाद आणि भारतीय लोकशाही’ या विषयावर प्रा. पाशा यांनी सुमारे दोन तास खिळवून ठेवणारी मांडणी केली. अध्यक्षस्थानी प्राचार्य विश्वास सायनाकर होते. प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठानतर्फे हे व्याख्यान झाले.
प्रा. पाशा म्हणाले, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला विरोध केला आणि संविधानाची निर्मिती करून हीच प्रतिसंस्कृती निर्माण केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोजक्या मताच्या बळावर सत्ता मिळवून संविधानविरोधी हल्ले सुरू केले तरी निराश होण्याची गरज नाही. कारण ६५ टक्के जनता त्यांच्या विरोधात आहे. त्यांनी आपला देश, संविधान २०२४ मध्ये वाचवला पाहिजे. समाजाचे सैनिकीकरण रोखले पाहिजे.
हिंदुत्व पेरण्याची प्रक्रिया सावरकर यांच्यापासून सुरू आहे. तेव्हापासूनच संविधानाला विरोध करण्याचा खटाटोप त्यांच्याकडून सुरू आहे. विद्वान लोकांना हाताशी धरून मनुस्मृतीचा पुरस्कार करणारे लेखन त्यांनी जाणीवपूर्वक गोरखपूर प्रेस, रंगा स्वामी यांचे दोन खंड, आनंदमठ कादंबरीच्या माध्यमातून केले आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा. सायनाकर म्हणाले, जातीपातीविरहित राहून आपण लढलो तर आपण जिंकू. या कार्यक्रमात ‘आरपार झुंझार’ या काव्यसंग्रहास मिळालेल्या पुरस्काराची दहा हजार रुपयांची रक्कम कवी एकनाथ पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठानकडे सुपूर्द केली.
पाशा यांच्या ‘फुले, शाहू, गांधी, आंबेडकर आणि ब्राह्मणी राष्ट्रवाद से संघर्ष’ पुस्तकाचे सरोज पाटील यांच्या हस्ते तर प्रा. एन. डी. पाटील लिखित ‘इतिहासाला कलाटणी देणारा लोकराजा शाहू’ या पुस्तकाचे प्रकाशन पाशा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. टी. एस. पाटील यांनी परिचय करून दिला. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार संपतराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.