धमकीची ध्वनिफित फॉरेन्सिककडे सोपवली, प्रशांत कोरटकरच्या मूळ आवाजाचे नमुने मिळाल्यानंतरच निष्कर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:15 IST2025-03-03T13:14:50+5:302025-03-03T13:15:05+5:30

पथके परतली, अटक करण्यात अपयश

The audio tape of the threat was handed over to forensics a conclusion only after getting Prashant Koratkar original voice samples | धमकीची ध्वनिफित फॉरेन्सिककडे सोपवली, प्रशांत कोरटकरच्या मूळ आवाजाचे नमुने मिळाल्यानंतरच निष्कर्ष 

धमकीची ध्वनिफित फॉरेन्सिककडे सोपवली, प्रशांत कोरटकरच्या मूळ आवाजाचे नमुने मिळाल्यानंतरच निष्कर्ष 

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना आलेल्या धमकीच्या फोनची ध्वनिफित जुना राजवाडा पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे सोपवली. ध्वनिफित आणि संशयित प्रशांत कोरटकर याच्या मूळ आवाजाची पडताळणी केल्यानंतरच निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली. दरम्यान, कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाल्याने त्याच्या शोधासाठी नागपूरला गेलेली पोलिसांची दोन पथके रविवारी रात्री परत आली.

प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. याबाबत सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन धमकीच्या फोनची ध्वनिफित पोलिसांकडे दिली आहे. ध्वनिफितीतील आवाज आणि संशयित कोरटकर याचा आवाज एकच आहे की दुसऱ्या कोणी कोरटकरच्या नावे फोन केला, याची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जात आहे. धमकीची ध्वनिफित फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. ध्वनिफितीतील आवाज आणि कोरटकरच्या मूळ आवाजाची पडताळणी करूनच याचा पुढील तपास करावा लागणार आहे. त्यासाठी कोरटकरला अटक होणे गरजेचे आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अटक करण्यात अपयश

संशयित कोरटकर याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पाच दिवस पोलिसांकडून त्याचा तपास सुरू होता. जुना राजवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस त्याच्या शोधासाठी नागपूरला गेले होते. नागपूर पोलिसही त्याच्या मागावर होते. पाच दिवस शोध घेऊनही तो पोलिसांना सापडला नाही. अखेर त्याला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळताच पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Web Title: The audio tape of the threat was handed over to forensics a conclusion only after getting Prashant Koratkar original voice samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.