आत्मा शुद्धी पर्युषण पर्वामागील मूळ उद्देश, ‘मिच्छा मी दुक्कडं’ म्हणजेच काय? जाणून घ्या
By संदीप आडनाईक | Published: September 16, 2023 03:50 PM2023-09-16T15:50:45+5:302023-09-16T15:51:07+5:30
संवत्सरीच्या दिवशी जैन समाजातील लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व निर्जळी व्रत करतात
संदीप आडनाईक
कोल्हापूर : पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी सूक्ष्मजीव जन्माला येतात. हे सर्व लक्षात घेऊन जैन मुनींनी या काळात एकाच ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याचा संदेश दिला आहे. पर्युषण पर्व काळात मन, वचन, काया, यांची संपूर्णपणे शुद्धी केली जाते. साधनेद्वारे समस्त जीवांची माफी मागितली जाते. आत्मा शुद्धी हा पर्युषण पर्व यामागील मूळ उद्देश आहे.
संवत्सरीच्या दिवशी जैन समाजातील लहान बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व निर्जळी व्रत करतात, स्थानक, मंदिर येथे आलोयना वाचन करतात आणि त्यानंतर ‘मिच्छा मी दुक्कडं’ म्हणजेच मी समस्त जीवांची माफी मागतो, असे म्हणतात. सायंकाळी जैन बांधव त्यांच्या धार्मिक स्थळी एकत्र येऊन प्रतिक्रमन करतात, यामध्ये ८४ लाख प्राणिमात्रांची क्षमायाचना केली जाते.
भगवान महावीर यांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सूत्रांद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे. पर्युषण पर्व सर्वांना काळात या सर्वांचा अंगीकार केला जातो. क्षमा मागणे आणि समोरच्या व्यक्तीला माफ करणे या दोन फार मोठ्या गोष्टी आहेत.
जैन संवत्सरी पर्वाविषयी सामान्य नागरिकांच्या मनात अनेक समज-गैरसमज आहेत. पर्युषण पर्व हा प्रत्येकाने साजरा करायला हवा, कारण त्यामुळे बिघडलेली कित्येक नाती पुन्हा जुळून येऊ शकतात. दुखावलेली कित्येक मने पुन्हा एकत्र येऊ शकतात, त्यामुळे हा कोणत्या ही एका जाती-धर्मा पुरता मर्यादित राहणारा सण न होता तो समस्त जगासाठी तो क्षमापणा दिन ठरावा. ज्यामुळे शेकडो अवघड वाटणारे प्रश्न सुटतील.
श्वेतांबर पंथीय - १३ दिवसीय पारणोत्सव (९ ते २१ सप्टेंबर)
- मुनिश्री कृपाशेखर विजय महाराज आणि साध्वी अचिंत्यप्रभाश्री महाराजांच्या उपस्थितीत २३४ तपस्वींचा सिद्धितप शंखनाद
- स्थळ : महावीर नगरातील श्री वासुपूज्य जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, महावीर नगर.
दिगंबर पंथीय - सम्यक ज्ञान पावन वर्षायोग (१६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर)
- प.पू. १०८ संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ नियमसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत षोडशकारण व दशलक्षण महापर्व
- स्थळ : श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर संघ, आर.के. नगर, मोरेवाडी रोड, शेंडा पार्क.