नंदवाळ येथील रिंगण सोहळ्यास भारत बटालियनने परवानगी नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 12:02 PM2022-03-28T12:02:18+5:302022-03-28T12:02:37+5:30
बटालियन मैदानावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून छावणीचे स्वरूप
सडोली (खालसा) : नंदवाळ येथील भारत राखीव बटालियनच्या मैदानावर होणाऱ्या रिंगण सोहळ्यासाठी भारत बटालियनने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ व बटालियन यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बटालियन मैदानावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिरात गेला आठवडाभर हरिनाम सप्ताह सुरू असून यासाठी सोमवारी रिंगण सोहळा व दिंडी असे कार्यक्रम होणार आहेत. यासाठी परिसरातून सुमारे सहा हजारांहून अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. हा रिंगण सोहळा भारत बटालियनच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला व भारत बटालियन अधिकारी यांच्याकडे मागणी केली. परंतु भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रिंगण सोहळा करता येणार नसल्याचे सांगितले. यामध्ये जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थ व बटालियन यांच्यात मध्यस्थी करून हा तिढा सुटण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तिढा सुटला नाही.
ग्रामस्थ व वारकरी त्याच मैदानावरच रिंगण सोहळा घेणार या निर्णयावर ठाम असल्याने अखेर करवीरचे उपअधीक्षक संकेत गोसावी, इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा ग्रामस्थांची भेट घेऊन कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये. शांतता राखून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर नंदवाळ येथील बटालियन जागेवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या मैदानावर परेड व ट्रेनिंग चालू असून ही जागा भारत बटालियनच्या मालकीची आहे. गावकऱ्यांनी आपला हक्क दाखवण्यासाठी या रिंगण सोहळ्याचे आयोजन केले असून त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखावी यासाठी आमच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला असून या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख पुढील निर्णय घेतील. - संदीप दिवाण, समुपदेशक, भारत राज्य राखीव बटालियन क्र. ३
भारत राखीव बटालियनने रिंगण सोहळ्यासाठी परवानगी नाकारली तरीही त्याच जागेवरच वारकरी परंपरेने आजचा रिंगण सोहळा घेणारच आहोत. -अस्मिता कांबळे, सरपंच नंदवाळ ग्रामपंचायत