हातावरचे पोट, मुलाचा आईकडे वाढदिवसाचा हट्ट; ..अन् केला आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 06:37 PM2022-12-14T18:37:26+5:302022-12-14T18:55:13+5:30

पोलिस चौकीत, मुलाने केलेल्या आगळिकीचे कारण सांगतानाही त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

The boy tried to commit suicide after refusing birthday wishes, incident of a pulachi Shiroli in Kolhapur | हातावरचे पोट, मुलाचा आईकडे वाढदिवसाचा हट्ट; ..अन् केला आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील घटना

संग्रहीत फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : वाढदिवसानिमित्त मित्रांसाठी घरी जेवण करण्याचा मुलाचा हट्ट आईने पुरवला नाही या रागातून शालेय मुलाने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच आईने त्याचा गळफास सोडवल्याने अनर्थ टळला. या घटनेत अत्यवस्थ झालेल्या रेहान राजू खाटिक (१५, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि. १३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला.

हातावरचे पोट असलेल्या येथील एक महिला शिरोली एमआयडीसीमध्ये फाउण्ड्रीत वाळू चाळण्याचे काम करतात. तीन वर्षांपूर्वी पती साथ सोडून निघून गेला. त्यानंतरही नेटाने फाउण्ड्रीत काम करून मीनाज आपला मुलगा रेहानला सांभाळतात. आठवीत शिकणाऱ्या रेहानचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त घरात मित्रांसाठी जेवण करण्याचा हट्ट त्याने आईकडे धरला. पण आर्थिक ओढाताणीमुळे आईने त्याला चिरमुरे, फरसाण आणि केक आणून वाढदिवस साजरा करण्यास सांगितले. याच रागातून रेहानने मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला.

हा प्रकार लक्षात येताच आईने तातडीने रेहानचा गळफास सोडवून त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर आता रेहानची प्रकृती स्थिर आहे; पण एकुलत्या मुलाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे आई अगतिक आहेत. सीपीआरच्या पोलिस चौकीत, मुलाने केलेल्या आगळिकीचे कारण सांगतानाही त्यांच्या डोळे वाहत होते. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली.

आईची हतबलता

मुलाच्या आईला दरमहा सात हजार रुपये पगार आहे. घरभाडे, लाइट बिल आणि पाणीपट्टीसाठी ३७०० रुपये खर्च होतात. उरलेल्या पैशात महिन्याचा बाजार, कपडे आणि मुलाच्या शाळेचा खर्च भागवावा लागतो. एवढ्या कमी पैशात वाढदिवस दणक्यात कसा करणार रे बाळा, असे त्या रेहानला समजावून सांगत होत्या.

दुसऱ्याने सरी घातली म्हणून..

हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. आई-वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपले हट्ट आणि लाड पुरवून घेणारी मुले अनेक घरात दिसतात. मुलांनीही परिस्थितीची जाणीव ठेवून थोडा समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. दुसऱ्यांना सरी घातली म्हणून आपण दोरीने गळा आवळून घेऊ नये, असे त्यासाठीच म्हटले जात असे.

Web Title: The boy tried to commit suicide after refusing birthday wishes, incident of a pulachi Shiroli in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.