'गडहिंग्लज कारखान्याच्या संभाव्य तोट्याला ब्रिस्क कंपनीच जबाबदार, मंत्री मुश्रीफांनी काय मदत केली'?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:57 PM2022-02-08T12:57:43+5:302022-02-08T12:58:50+5:30
विरोधकांना कारखान्यापेक्षा कंपनीचीच अधिक काळजी
गडहिंग्लज :बँकांची देणी व शासकीय कर्जासाठी वाढवून दिलेल्या २ वर्षांसह ४ वर्षे आधी कारखाना सोडल्यामुळे ४ वर्षातील कारखान्याच्या संभाव्य तोटयाला 'ब्रिस्क कंपनी'च जबाबदार आहे, असा आरोप आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
चालू हंगामातील तथाकथित १२ कोटींच्या तोट्यासह कारखान्याच्या वजन काट्याबाबत व मनमानी कारभाराबाबत विरोधी संचालकांकडून दिशाभूल सुरू आहे.परंतु,दोन- अडीच कोटींपेक्षा अधिक तोटा होणार नाही, असे स्पष्ट करतांनाच विरोधकांना कारखान्यापेक्षा कंपनीचीच अधिक काळजी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिंदे म्हणाले,२०१३ मध्ये ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी कारखाना 'ब्रिस्क'ला चालवायला दिला होता.परंतु, कंपनीकडून ३९ कोटी ७७ लाख मिळाले असून अद्याप ३ कोटी २६ लाख येणे आहेत.
संचालक मंडळ आणि कंपनीत कोणताही वाद नसतानाही शासनाने एकतर्फी कारखाना संचालकांच्या ताब्यात दिला.संचालक मंडळाच्या सर्वाधिकारानुसारच उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे व आपण कारखाना स्वबळावर सुरू केला आहे.परंतु, त्यात आजही अडथळे आणले जात आहेत. त्यांचा शोध व समाचार सूज्ञ गडहिंग्लजकर नक्कीच घेतील.
यावेळी संचालक अमर चव्हाण, संभाजी नाईक व बाळकृष्ण परीट, शशिकांत चोथे उपस्थित होते.
शिंदे म्हणतात..
- मंत्री मुश्रीफ यांना मदतीसाठी भेटूनही ते नाकारतात. कारखाना वेळेवर सुरू होण्यासाठी त्यांनी काय मदत केली ?
- 'ब्रिस्क'कडून कामगारांचे १४ कोटी व तोडणी वाहतूक कमिशन २५ टक्के येणे आहे.
- सप्टेंबर २०१९ अखेरचा कामगार पगार कंपनी देईल, असे आश्वासन मुश्रीफांनी दिले आहे ते पाळणार का?
- कारखान्याने कंपनीला २४ कोटी ६५ लाख देण्याचा सहकार सचिवांचा आदेश बेकादेशीर असून त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याचेच दुःख कंपनीला पाठिंबा देणाऱ्या संचालकांना आहे.