खळबळजनक! इचलकरंजीत तरुणाचा निर्घृण खून, दोघा संशयितांकडे कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:22 AM2022-04-11T11:22:15+5:302022-04-11T14:09:41+5:30
इचलकरंजी : येथील वखारभाग परिसरातील एका निर्जनस्थळी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. उदय मधुकर गवळी (वय २५, रा. ...
इचलकरंजी : येथील वखारभाग परिसरातील एका निर्जनस्थळी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. उदय मधुकर गवळी (वय २५, रा. रेणुकानगर झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
वखारभागात एका व्यापारी संकुलाच्या बाजूला मोठी मोकळी जागा पडीक आहे. त्याठिकाणी मोठमोठी झाडेझुडुपे उगवली आहेत. अशा निर्जनस्थळी उदय याचा काल, रविवारी (दि.१०) रात्री खून करण्यात आला. प्रथमदर्शनी डोक्यात हातोडा मारून डोके दगडावर आपटून त्याचा खून केल्याचे दिसून येते. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात नेला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, निरीक्षक महादेव वाघमोडे, आदींनी भेट दिली.
या प्रकरणाचा तातडीने पोलिसांनी तपास सुरू केला असून, दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अद्याप खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ताब्यात घेतलेल्यांकडे कसून चौकशी सुरू असून, सायंकाळपर्यंत याबाबतचा उलगडा होईल, असा अंदाज वाघमोडे यांनी व्यक्त केला.