अदानीचे देणे फेडण्यासाठीच प्रचंड वीज दरवाढीचा बोजा; इंधन समायोजन आकार विनियमांचा गैरवापर
By विश्वास पाटील | Published: July 12, 2022 06:15 PM2022-07-12T18:15:31+5:302022-07-12T18:15:45+5:30
वीज क्षेत्राचे अभ्यासक प्रताप होगाडे यांची टीका
कोल्हापूर: "महावितरण कंपनीने नुकतीच इंधन समायोजन आकार आकारणी जाहीर केली आहे. या आकारणीनुसार जून 2022 ते ऑक्टोबर 2022 या पाच महिन्यांच्या देयक कालावधीसाठी राज्यातील सर्व पावणेतीन कोटी वीज ग्राहकांवर दरमहा किमान 1300 कोटी रुपये दरवाढीचा बोजा पडणार आहे. सरासरी अतिरिक्त बोजा प्रति युनिट 1.30 रुपया आहे. एकूण बोजा 6500 कोटी रुपये आहे. हा बोजा म्हणजे 5 महिन्यांसाठी दरवाढ 20 टक्के आहे.
प्रत्यक्षात वीज खरेदी खर्चातील मार्च ते मे 2022 या 3 महिन्यातील एकूण वाढ फक्त 1448 कोटी रुपये आहे. तथापि अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीच्या देण्यापोटी 6253 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे आणि आयोगाने त्याला मान्यता दिली आहे. केवळ अदानीच्या हितासाठी राज्यातील सर्व 2.75 कोटी वीज ग्राहकांना वेठीला धरले जात आहे अशी टीका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्यावतीने अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी मंगळवारी येथे केली.
होगाडे यांचे म्हणणे असे : ऊन्हाळ्यातील मार्च ते मे 2022 या तीन महिन्यांच्या काळामध्ये वीज खरेदी खर्चातील वाढ अनुक्रमे मार्च 110 कोटी रु. एप्रिल 408 कोटी रु. व मे 930 कोटी याप्रमाणे वाढीस आयोगाने मान्यता दिली. तथापि एप्रिल 2022 च्या हिशोबामध्ये अदानी पॉवरचे 50 टक्के देणे भागविण्यासाठी 6253 कोटी रुपये तरतूद करण्यात आली. त्यामुळे एकूण मंजुरी 7764 कोटी रुपये त्यामधील 5 महिन्यांतील वसूली 6538 कोटी रुपये व राहिलेली 1226 कोटी रुपये वसूली पुढील काळात म्हणजे डिसेंबरपासून होणार आहे.
अदानी पॉवरचा कायद्यातील बदल (Change in Law) या अंतर्गत केंद्र सरकारचा वस्तू व सेवा कर आणि कोल इंडियाचा स्थलांतर सुविधा आकार (Evacuation Facility Charge) या संबंधित अतिरिक्त खर्चाच्या मागणीचा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार अदानीच्या बाजूने झाला. सर्वोच्च न्यायालयाने थकबाकीची 50 टक्के रक्कम त्वरित भागवावी असे आदेश दिले. ही रक्कम देण्याची इतकी कोणती घाई महावितरणला झाली हे सर्व अनाकलनीय आहे. ही रक्कम 5 हप्त्याऐवजी चर्चा व सहमतीने 10/15/20 हप्त्यांत विभागता आली असती. त्याआधारे ग्राहकांवरील दरमहाचा बोजा सुलभ व कमी करता आला असता. पण दुर्दैवाने कंपनीला ग्राहकांच्या सोयीपेक्षा अदानी पॉवरची सोय अधिक महत्त्वाची वाटते हे कटू सत्य आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंधन समायोजन आकाराच्या एकूण हिशोबामध्ये वीज वितरण गळती 14 टक्केच्या ऐवजी मार्चमध्ये 35 टक्के एप्रिलमध्ये 30 टक्के व मेमध्ये 26 टक्के याप्रमाणे दाखवून मान्यता देण्यात आली आहे. महानिर्मिती कंपनीची अकार्यक्षमता, महावितरण कंपनीची गळती व अदानीचे देणे यांचा सर्व बोजा ग्राहकांवर टाकण्यात आला आहे.
राज्यामध्ये नोव्हेंबर 2016 मध्ये साडेचार हजार मेगावॅट वीज अतिरिक्त होती. आज 2022 साली 3000 मेगावॉट अतिरिक्त वीज आहे हे आयोगानेच आपल्या 30 मार्च 2020 च्या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. ही वीज न वापरताही राज्यातील सर्व ग्राहक नोव्हेंबर 2016 पासून दरमहा प्रति युनिट 30 पैसे जादा भरत आहेत. 3000 मेगावॉट अतिरिक्त वीज असताना वीज खरेदी खर्च वाढतो, याचा अर्थ प्रत्यक्षात सर्व प्रकल्पांतून पूर्णपणे वीज निर्मिती होत नाही हे स्पष्ट आहे. निर्मिती 75 ते 80 टक्के होणे आवश्यक आहे प्रत्यक्षात कधीही 70 टक्केच्या वर झालेली नाही. सरासरी 65 टक्क्यांच्या घरात राहते, त्यामुळे कमी पडणारी 15 ते 20 टक्के वीज बाजारातून विकत घेतली जाते आणि जादा खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकला जातो हे पूर्णपणे चुकीचे आहे. हा कमी उत्पादनामुळे वाढणारा बोजा अकार्यक्षम निर्मिती कंपन्यावर टाकण्यात आला पाहिजे.
महावितरणची गळती 14 टक्के ऐवजी सरासरी 30 टक्के कशी मान्य करण्यात आली हेही न उलगडणारे कोडे आहे. गेली 10 वर्षे आम्ही महावितरण, आयोग व राज्य सरकार यांना गळती 30 टक्क्यांहून अधिक आहे हेच सातत्याने सांगत आहोत. पण कांही सुधारणा होत नाहीत. पण येथे गळती सहज 30 टक्के मान्य केली जाते. ही सोयीस्कर मान्यता आहे. प्रत्यक्षात 16 टक्के जादा वीज खरेदीला या मार्गाने मान्यता दिली जात असेल तर तेही चुकीचे आहे. कंपनी गळती 14 टक्के आहे असे म्हणते तर मग त्यावरील अतिरिक्त गळती 16 टक्के या गळतीची रक्कम आणि तो बोजा महावितरण कंपनीवर टाकण्यात आला पाहिजे, प्रत्यक्षात हे घडत नाही.
महानिर्मिती आणि महावितरण या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या वाढीचे कोणतेही देणे घेणे आणि सोयरेसुतक नाही. कारण ही सर्व दरवाढ इंधन समायोजन आकार या नावाखाली ग्राहकांकडून वसूल केली जाते. ग्राहकाचा कोणताही दोष नसतो, तरीही भुर्दंड ग्राहकावरच लागतो. त्यामुळे अंतिम नुकसान हे ग्राहकांचेच होते. प्रत्यक्षात अकार्यक्षमता आणि गळती हा बोजा संबंधित कंपन्यांवर टाकण्यात आला पाहिजे. त्यासाठी या सर्व हिशेबांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत कठोर तपासणी करण्यात आली पाहिजे. योग्य व कठोर तपासणीनंतर अतिरिक्त इंधन समायोजन आकार रद्द करण्यात यावा अशीही मागणी होगाडे यांनी केली आहे.
असे आहे साटेलोटे...
महावितरणने मागणी केली आणि आयोगाने मान्यता दिली. हे उघड साटेलोटे आहे. कंपनीचे व बड्या उत्पादकांचे हितचिंतक आज आयोगामध्ये आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना या बाबतीत न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही. त्यामुळे या संदर्भात या इंधन समायोजन आकाराची अचूक तपासणी व्हावी व चुकीची आकारणी कायमस्वरूपी रद्द करण्याची कायदेशीर तरतूद करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व अन्य विविध संघटना यांच्या वतीने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडे केली जाईल.