Kolhapur: मिणचे खुर्द येथे कालवा फुटला, शेताला आलं तळ्याचे स्वरूप; पिकांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 06:09 PM2023-04-08T18:09:25+5:302023-04-08T18:11:19+5:30
पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण केले. परिणामी ठिकठिकाणी कालवा फुटू लागला आहे.
शिवाजी सावंत
गारगोटी: भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस असलेला उजवा कालवा काल, शुक्रवारी मध्यरात्री फुटला. कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे शेतीचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पाटबंधारे विभागाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. हा कालवा फुटणे हे नित्याचेच झाले आहे.
दूधगंगा उजवा कालवा शाखा कूर ते मिणचे खुर्द पर्यंतच्या दुरुस्तीची व सफाईची कामे करण्यात आली आहेत. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून नियमाप्रमाणे होत नाही अशा तक्रारी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केल्या होत्या. पण पाटबंधारे विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष करून काम पूर्ण केले. परिणामी ठिकठिकाणी कालवा फुटू लागला आहे.
हा कालवा फुटणे हे प्रत्येक वर्षी सुरु असते. पावसाळ्यात तर कालव्याचे काठ ढासळून नुकसान होत असते. दरवर्षी या कालव्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केले जातात. पण मजबुतीकरण आणि अस्तरीकरणाचा प्रश्न जैसे थे'च राहतो.
पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, उपअभियंता चव्हाण, उपअभियंता अजिंक्य पाटील शाखा अभियंता तनुजा देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत ताबडतोब उपाययोजना करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.