हसूर दुमाला येथे भरधाव कारने शालेय विद्यार्थ्यांना उडवले, सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 03:56 PM2022-01-31T15:56:38+5:302022-01-31T16:08:55+5:30
भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
तानाजी पोवार
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे भरधाव मोटारकारने शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना उडवल्याची घटना आज, सोमवारी सकाळी घडली. या अपघातात सी. बी. पाटील विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यासह एकूण सहा जण जखमी झाले. अपघातानंतर पालकांची व शिक्षकांचे धाबे दणाणले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात हालवले.
ओंकार तानाजी पाटील (वय १६), विश्वजीत केरबा पाटील (१६, दोघेही रा. हिरवडे खालसा, ता. करवीर), साईराज काशिनाथ पाटील (१६), उत्कर्ष उत्तम खोरुसे (१५), तेजस तानाजी पाटील (१६) यां विद्यार्थ्यासह युवराज विठ्ठल पाटील (३६ सर्व रा. भाटणवाडी, ता. करवीर) अशी जखमीची नावे आहेत.
पोलिसांनी व जखमींच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, हसूर दुमाला येथील सी. बी. पाटील विद्यालय या शाळेचे सुमारे आठ ते दहा विद्यार्थी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एकत्रीत पायी शाळेला निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची प्रथम युवराज पाटील यांना धडक झाली आणि थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसली. या मोटारीची धडक लागल्याने अनेक विद्यार्थी उडून रस्त्याकडेला पडले. या अपघातात पाच विद्यार्थ्यासह एकूण सहाजण जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. जखमींना तातडीने खासगी वाहनातून कोल्हापुराच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले, तेथे प्रथमोपचार करुन त्यांना खासगी रुग्णालयात हालवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच शाळेचे शिक्षक व पालकाचा थरकाप उडाला. त्यांनी घटनास्थळी व कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे सीपीआर परिसरात गर्दी झाली होती.
कार शिक्षकांचीच
अपघातग्रस्त मोटारीत दोघे शिक्षक असल्याचे समजते. ते राधानगरीकडे जात होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोटारचालकावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.