कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरण हरित न्यायालयात, राजू शेट्टींनी दाखल केली याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:30 PM2023-03-14T12:30:02+5:302023-03-14T12:30:31+5:30
कृष्णा नदीपात्रात औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातील मळीमिश्रित दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी
कोल्हापूर : कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने सोमवारी ही याचिका दाखल केली.
या याचिकेत साखर कारखाने, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. या याचिकेत सरोदे यांच्यासह ॲड. गौतम रमाकांत कुलकर्णी, ॲड. सुघांशी रोपिया हे न्यायालयीन काम बघत आहेत. कृष्णा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळीमिश्रित पाणी विनाप्रक्रिया सोडले जात असल्यामुळे आणि नदीतील वाहते पाणी कमी झाल्यामुळे जलचर संकटात आले आहेत, मासे मृत होत आहेत.
कोणतीही प्रक्रिया न करता महानगरपालिकेद्वारे कृष्णा नदीत सांडपाणी सोडले जाते, कृष्णा नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करीत नाही आणि दरवेळी केवळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात येते, असा आरोप शेट्टी यांनी याचिकेतून केला आहे. शेट्टी यांच्यासह प्रकाशतात्या बालवडकर, अनिल बाळू मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले, बाळगोंडा म्हदगोंडा पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व स्वतः शेतकरी सुद्धा याचिकाकर्ते आहेत.
तातडीने होणार सुनावणी
हरिपूर येथे वारणा नदीचा संगम झाल्यानंतरच्या नदीपात्रामध्ये मृत माशांचा खच पडला होता. मृत मासे झुंडीने काठाला येत होते. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली. खरे तर कारखान्यातील मळी कृष्णा नदीत सोडल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मेलेत व जलचर जीवनाचा नाश झाला व जैवविविधता नष्ट झाली हे स्पष्ट असतानाही साखर कारखान्याला कारवाईपासून अभय का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. या पर्यावरणहित याचिकेची सुनावणी येत्या आठवड्यात तातडीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या न्या. डी. के. सिंग व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या समक्ष होणार असल्याचे सांगण्यात आले.