Bribe Case: जीएसटी अधीक्षकासह निरीक्षक ५० हजाराची लाच घेताना 'सीबीआय'च्या जाळ्यात, जयसिंगपुरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 11:27 AM2022-04-30T11:27:40+5:302022-04-30T11:30:36+5:30
सेवा कराचे हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अधीक्षक नेसरीकर व निरीक्षक मिश्रा यांनी तक्रारदार यांच्याकडून ७५ हजार रुपयाची मागणी केल्याचे समजते. चर्चाअंती ५० हजार रुपयात हा तोडगा ठरला.
जयसिंगपूर : व्यापाऱ्याचे सेवा कर दायित्वबाबतचे प्रकरण निकाली काढण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना जयसिंगपूर येथील केंद्रीय जीएसटी विभागाचे अधीक्षक महेशकुमार नेसरीकर व निरीक्षक अमितकुमार मिश्रा यांना रंगेहात पकडण्यात आले. सीबीआयच्या पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, संशयितांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सूत्रांच्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील एका व्यापाऱ्याने ही तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्याकडून कर सल्लागारमार्फत सन २०१७-१८ ते २०२०-२१ या वर्षासाठीच्या सेवा कर दायित्वाबाबत प्रकरण जयसिंगपूर येथील केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडे आले होते. याबाबत गुरुवारी लाचेबाबत सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे व्यापाऱ्याने तक्रार दिली होती. सेवा कराचे हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अधीक्षक नेसरीकर व निरीक्षक मिश्रा यांनी तक्रारदार यांच्याकडून ७५ हजार रुपयाची मागणी केल्याचे समजते. चर्चाअंती ५० हजार रुपयात हा तोडगा ठरला.
सीबीआयच्या पथकाने सापळा रचून निरीक्षक मिश्रा यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्यानंतर अधीक्षक नेसरीकर यांनाही पकडण्यात आले. जयसिंगपूर व कोल्हापूर येथे दोन्ही संशयित आरोपींच्या घरांचीही झडती घेण्यात आली.
यामध्ये कागदपत्रे जप्त आल्याचे सूत्रांकडून करण्यात समजते. शिवाय, कार्यालयातील कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचे सांगितले.
एक दिवसाची पोलीस कोठडी
संशयित अधीक्षक महेशकुमार नेसरीकर आणि निरीक्षक अमितकुमार मिश्रा यांना शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जयसिंगपूर येथील विशेष सरकारी वकील यांच्या उपस्थितीत हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.