साखर उद्योगासाठी गोड बातमी, केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 05:11 PM2022-11-03T17:11:30+5:302022-11-03T17:11:58+5:30

केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती.

The central government has increased the price of ethanol produced directly from sugarcane juice by Rs 2 16 paise per litre | साखर उद्योगासाठी गोड बातमी, केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केली वाढ

साखर उद्योगासाठी गोड बातमी, केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात केली वाढ

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : केंद्र शासनाने उसाच्या रसापासून थेट तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात लिटरला २ रुपये १६ पैसे वाढ करण्याचा साखर उद्योगाच्या दृष्टीने चांगला निर्णय बुधवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दरास मंजुरी दिली. देशांतर्गत साखर उद्योगातील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल जास्तीत जास्त वेळेत मिळावे, यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे केंद्र शासनाने म्हटले आहे. या निर्णयाचे महाराष्ट्रातील सहकारी व खासगी साखर उद्योगानेही स्वागत केले आहे.

साखर उद्योग तीन पद्धतीने इथेनॉलचे उत्पादन घेतो. त्यामध्ये ज्या कारखान्यांचे मुख्य उत्पादन साखर आहे, असे कारखाने सी हेवी पद्धतीने इथेनॉल उत्पादन करतात. त्याचा लिटरचा दर ४६ रुपये ६६ पैसे होता त्यात २ रुपये ७५ पैसे वाढ करण्यात आली. बी हेवी पद्धतीने होणाऱ्या इथेनॉलचा दर ५९.०८ रुपये होता त्यात १.६५ पैसे वाढ करण्यात आली आणि साखरेच्या रसापासून थेट इथेनॉल केले जाते, त्यासाठी २ रुपये १६ पैसे वाढवण्यात आले. केंद्र शासनाने यंदा एफआरपी वाढवल्याने ती रक्कम व उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालताना कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडणार होते. म्हणून इथेनॉलचा दर वाढवण्याची साखर उद्योगाची मागणी होती.

रसापासून जिथे थेट इथेनॉल केले जाते त्याचा दर लिटरला किमान ७ रुपयांनी वाढवावा, असे साखर उद्योगाला वाटत होते. हा दर वाढला तर जास्तीत जास्त उसापासून इथेनॉल निर्मिती होईल व त्यामुळे देशांतर्गत बाजारात गरजेइतकीच साखर राहू शकेल. तो समतोल साधल्याशिवाय साखरेला दरही चांगला मिळणार नाही व त्याशिवाय उसालाही दर देता येणार नाही; परंतु केंद्र शासनाने तेवढा दर वाढवला नसला तरी केलेली दरवाढही चांगलीच आहे.

प्रकार   -  जुना दर  -   नवा दर  -  वाढ

सी हेवी  -  ४६.६६  -  ४९.४१   - २.७५

बी हेवी  -  ५९.०८  -  ६०.७३   - १.६५

सिरप    -  ६२.६५  -  ६५.६१    - २.१६

केंद्र शासनाने इथेनॉलचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे; परंतु उसाच्या सिरपपासून जिथे इथेनॉल केले जाते, त्याचा दर आता २ रुपये १६ पैसे वाढवला आहे. तो समाधानकारक नाही. त्यामध्ये किमान लिटरला ५ रुपये वाढ अपेक्षित होते. त्याशिवाय देशांतर्गत साखर बाजाराचा समतोल नियंत्रित होऊ शकणार नाही. - विजय औताडे, साखर उद्योगाचे अभ्यासक कोल्हापूर.

महाराष्ट्रातील इथेनॉल उद्योग

  • इथेनॉल उत्पादनाची वार्षिक क्षमता : २६४ कोटी लिटर
  • सहकारी व खासगी प्रकल्प : ११२
  • सी हेवीपासून उत्पादन : ४६.६६ कोटी लिटर
  • बी हेवीपासून उत्पादन : ५९.०८ कोटी लिटर
  • सिरपपासून उत्पादन : ६३.४५ कोटी लिटर

Web Title: The central government has increased the price of ethanol produced directly from sugarcane juice by Rs 2 16 paise per litre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.