महाराष्ट्र एकीकरण समितीची 'चलो मुंबई'ची हाक!, शरद पवारांशी चर्चा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 12:33 PM2023-02-03T12:33:27+5:302023-02-03T12:33:56+5:30
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बेळगावात झाली बैठक
बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर असलेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाग आणून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ''चलो मुंबई''ची हाक देण्यात आली आहे. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी हजारो सीमावासीय मुंबईला धडकणार आहेत. येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. बेळगाव येथे गुरुवारी झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेला महामेळावा दडपण्यासाठी समिती नेत्यांना अटक करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीने ‘चलो कोल्हापूर’ची हाक देत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन छेडले. सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आला असून महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या तारखा लांबणीवर पडत आहेत.
कर्नाटक सरकारकडून खटल्यासाठी दरमहा ६० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, सीमाप्रश्नी खटला चालविण्यासाठी वकिलांना फी देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. ही परिस्थिती अशी असेल तर सीमाप्रश्नी खटला कुणाच्या आशेवर लढवायचा? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यामुळे महाराष्ट्राला जाग आणून देण्यासाठी २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
बैठकीत शहर समितीचे दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, रणजित चव्हाण पाटील, बी. डी. मोहनगकर आदींसह इतर समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.