बनावट धनादेश प्रकरण: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीचे अध्यक्षच बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:57 IST2025-03-05T11:56:40+5:302025-03-05T11:57:30+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचेही पत्र : संतोष जोशी यांच्याकडे जबाबदारी

बनावट धनादेश प्रकरण: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीचे अध्यक्षच बदलले
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या बनावट धनादेशाद्वारे ५७ कोटींच्या टळलेल्या फसवणूकप्रकरणी जिल्हा परिषदेने त्रिसदस्यीय स्वतंत्र चौकशी समिती स्थापन केली होती. मात्र, दोनच दिवसांत समितीचे अध्यक्षच बदलण्याची वेळ आली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा परिषदेत असलेल्या मूळ धनादेशासारखे तीन धनादेश तयार करून फसवणूक करण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु वेळीच वित्त विभागाच्या लक्षात ही गोष्ट आल्याने ही मोठी फसवणूक टळली. याबाबत नेमकी वस्तुस्थिती समोर यावी यासाठी चार दिवसांपूर्वी निधी लेखा विभागाचे सहायक संचालक सुशीलकुमार केंबळे यांच्या अध्यक्षतेखाली कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांचा सदस्य म्हणून समावेश असलेली ही समिती नेमण्यात आली. तर पाणी व स्वच्छता विभाग, जलजीवन प्रकल्प संचालक माधुरी परीट या समितीच्या सदस्य सचिव आहेत.
मात्र, केंबळे आणि नराजे या थेट जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत नसल्याने याठिकाणी नेमक्या कुणाच्या पत्राने ही नियुक्ती करायची, असा मुद्दा पुढे आला. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या दोघांसह अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांची सदस्य म्हणून चौकशी समितीवर नियुक्ती केली आहे. तर केंबळे यांच्याऐवजी चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज, बुधवारपासून खऱ्या अर्थाने चौकशी समितीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.