Kolhapur: चांगभलंच्या गजरात रंगला जोतिबा यात्रेचा गुलाल, रणरणत्या उन्हातही लाखो भाविकांची मांदियाळी
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 12, 2025 16:37 IST2025-04-12T16:36:25+5:302025-04-12T16:37:53+5:30
पालकमंत्र्यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची उधळण. जोतिबाच्या नावानं चांगभलंचा गजर, गगनचुंबी सासनकाठ्यांचा ऐट, त्यांचा भार सांभाळून नाचवताना तहान भूक विसरणारे भाविक, महापूजा, अभिषेक, आरती, सायंकाळी पालखी सोहळा अशा पारंपारिक उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा आज, शनिवारी पार पडली. रणरणत्या उन्हाचे चटके ही सुसह्य वाटावेत एवढ्या अपरिमित भक्तीचा, देव आणि भाविकांच्या भेटीचा हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना कृतार्थ भाव प्रकटला. संपूर्ण परिसर गुलालाने न्हाऊन निघाला होता.
महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जोतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली. देवाच्या भेटीच्या ओढीने गेल्या बैलगाडी, पायी, वाहनांमधून आठ दिवसांपासून अखंड प्रवास करत असलेले भाविक डोंगरावर विसावले. मंदिराचा कळस बघताच जोतिबाच्या नावाचा गजर झाला.
महापूजेनंतर देवाची सरदारी रुपातील सालंकृत पूजा
शनिवारी पहाटे ४ वाजता देवाची काकड आरती, मुख प्रक्षालन झाले. त्यानंतर पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. महापूजेनंतर देवाची सरदारी रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारी साडे बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते निनाम पाडळी येथील मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले.
यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जोतिबा मंदिर व्यवस्थापक धैर्यशील तिवले, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाईंना खांद्यावरून उचलून सासनकाठीपर्यंत नेले
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विहे (जि. सातारा) येथील दुसऱ्या क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी सासनकाठीधारकांनी मंत्री शंभूराज देसाई यांना खांद्यावरून उचलून सासनकाठीपर्यंत नेले. त्यांनी सासनकाठीला मानाचा फेटा अर्पण केला. त्यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या मानाच्या १०८ सासनकाठ्या त्यांच्या अनुक्रमांकानुसार मिरवणुकीत सहभागी झाल्या.
सायंकाळी साडे पाच वाजता पालखी
सायंकाळी साडे पाच वाजता देवाच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. रात्री आठ वाजता यमाई व जमदग्नींचा विवाह सोहळ्यानंतर भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता श्री जोतिबा देवाची पालखी मंदिरात परतणार. रात्रभर देवाचे दर्शन सुरू राहणार आहे.