Jyotiba Chaitra Yatra:दोन वर्षांनंतर चांगभलंच्या गजरात दुमदुमला जोतिबाचा डोंगर, भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 05:00 PM2022-04-16T17:00:01+5:302022-04-16T17:01:35+5:30
पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत,बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात देवाला साकडे घातले.
कोल्हापूर : जोतिबाच्या नावानं चांगभलं चा गजर, हलगी, ढोल ताशांचा निनाद, गुलाल खोबऱ्याची उधळण, आकाशाला गवसणी घालणाऱ्या ससानकाठ्या, मिरवणूक, पालखी सोहळा अभुतपूर्व उत्साहात आज, शनिवारी दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यात्रा होत असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची अलोट गर्दी होती. पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत,बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात देवाला साकडे घातले.
कोरोनानंतर दोन वर्षांनी यात्रा झाल्याने देवाच्या भेटीची आस घेवून लाखो भाविक गेल्या दोन दिवसांपासून डोंगरावर येत होते. पण गर्दीचे व्यवस्थापन, जाण्या येण्यासाठी स्वतंत्र रांगा, वाढीव पार्कींग आणि वाहतुकीचे प्रशासनाने नेटके नियोजन करुन यात्रा सुरळीत पार पाडली. सकाळी साडेअकरा वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांचे जोतिबा मंदिरात आगमन झाले. बारा वाजता त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन झाले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील यांनी भाविकांनी ही यात्रा संयमाने आणि शांततेत पार पाडावी, असे आवाहनही केले.
दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली. चार वाजता देवाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यमाई मंदिराला भेट दिल्यानंतर तिथे विवाहसोहळा झाला व देवाची पालखी रात्री पून्हा मंदिरात आली. आज रविवारी पाकाळणी होणार आहे.
ठिकठिकाणी पार्कींगची सोय
यंदा भाविक संख्या वाढणार याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने पार्कीगची ठिकाणे वाढवली होती. त्यामुळे एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी न होता विखुरली गेल्याने वाहतुक यंत्रणा व पोलीस प्रशासनावर ताण आला नाही.
अन्नछत्रचा २ लाखांवर भाविकांना लाभ
भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट व गायमुख येथे सहजसेवा ट्रस्टच्यावतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २ लाखांवर भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. सहजसेवा ट्रस्टच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात दोनशेच्यावर भाविकांनी रक्तदान केले.