NCP: ‘संकल्प’ तडीस नेण्याचे राष्ट्रवादीसमोर आव्हान, यात्रेत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या गाऱ्हाण्यांची सोडवणूक होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 11:43 AM2022-04-25T11:43:19+5:302022-04-25T11:43:55+5:30
परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील २८८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मांडलेली गाऱ्हाण्यांची सोडवणूक होऊन पक्षाने अधिक मजबुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन केले तर ती यात्रेची फलश्रुती ठरेल.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोल्हापुरातील विराट सभेने राज्यात नंबर वन होण्याचा संकल्प केला असला तरी तो तडीस नेण्याचे आव्हान पक्षासमोर निश्चितच आहे. परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील २८८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मांडलेली गाऱ्हाण्यांची सोडवणूक होऊन पक्षाने अधिक मजबुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन केले तर ती यात्रेची फलश्रुती ठरेल.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी पक्षाचे ५६ आमदार निवडून आले होते, स्थापनेनंतर सलग पंधरा वर्षे सत्तेत राहिला. सत्तेच्या सुरुवातीच्या काळात पक्ष झपाट्याने वाढला, खेडोपाडी पक्षाची ताकद झाल्याने २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७१ जागा जिंकत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. मात्र, सत्तेचे केंद्रीकरण काही ठरावीक गटापुरतेच मर्यादित राहिल्याने पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला जाऊ लागला. हे जरी खरे असले तरी आजही पक्षाचा कार्यकर्ता गावोगावी उभा आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही २०१४ ला पक्षाचे ४१ आमदार निवडून आले. आता पक्षाचे ५३ आमदार आहेत, अनपेक्षितपणे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.
गेली अडीच वर्षे पक्ष सत्तेत आहे, मात्र या सत्तेची फळे नेत्यांपुरतीच सीमित राहिल्याची खदखद सामान्य कार्यकर्त्यात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद परिवार यात्रेच्या माध्यमातून २८८ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. या दरम्यान कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली, अडचणी सांगितल्या. त्याची सोडवणूक करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीत यश संपादन केले तरच या १४ हजार किलो मीटर परिवार संवाद यात्रेची फलश्रुती ठरेल. या निवडणुकांवरच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नंबर वन बनण्याचा पक्षाध्यक्षांनी केलेला संकल्प तडीस जाईल.
जयंतरावांची दूरदृष्टी पक्षाला बळ देणारी
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांनी पक्षाला नवीन लुक देण्याचा प्रयत्न केला. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सक्षम सेलची बांधणी केवळ राष्ट्रवादीकडे आहे. तरुण आक्रमक चेहरे त्यांनी तयार केले आहेत. बूथ कमिट्याची बांधणी करताना त्यांनी २०२९ व २०३४ च्या विधानसभेचे दृष्टी ठेवून कामाला सुरुवात केली आहे.
आघाडी एकसंध राहिलीतर बंडखोरी अटळ
विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविण्याच्या हालचाली सध्या तरी तिन्ही पक्षात दिसत आहेत. तिन्ही पक्षाचे सध्या १५३ विद्यमान आमदार आहेत, उर्वरित १३५ जागांचा तिढा सोडवावा लागेल. या जागा तिघांना समान दिल्यातर प्रत्येकाला आणखी ४५ जागा मिळू शकतात. शिवसेनेला १०१, राष्ट्रवादीला ९८ तर कॉंग्रेसला ८९ जागांवर लढावे लागेल. यातून नाराजीची संख्या अधिक होऊन बंडखोरी अटळ आहे. ती थोपवण्याचे आव्हानही आघाडीसमोर असेल.
कोल्हापुरातून राजकीय दिशा
कोल्हापूर ही जशी शाहूंची पुरोगामी भूमी तशीच ती राष्ट्रवादीच्या स्थापनेची साक्षीदारही आहे. त्यामुळे आताच्या देशभर भेदरलेल्या वातावरणात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला दिशा देण्यासाठी शरद पवार यांनी कोल्हापूरची निवड केली. २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची काय दिशा असेल याची पायाभरणी या संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने झाली. आता हीच दिशा घेऊन पुढील राजकीय वाटचाल होणार आहे, हे निश्चित आहे. फक्त आता याचे सारथ्य काेण करणार, महाविकास आघाडी एकसंघ राहणार, देशपातळीवर यूपीए बळकट होणार, हे येणारा काळच ठरवेल.