कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाघाला फुटीने घेरले, जनाधार टिकवण्याचे आव्हान

By समीर देशपांडे | Published: October 26, 2024 04:13 PM2024-10-26T16:13:02+5:302024-10-26T16:13:30+5:30

समीर देशपांडे कोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ...

The challenge of retaining ShivSena base in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाघाला फुटीने घेरले, जनाधार टिकवण्याचे आव्हान

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाघाला फुटीने घेरले, जनाधार टिकवण्याचे आव्हान

समीर देशपांडे

कोल्हापूर : काँग्रेसच्या पारंपरिक राजकारणाला कंटाळलेल्या तरुणाईला १९९० नंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर भाषणे आवडू लागली. ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो’ असे म्हणून ठाकरे तरुणाईला भावेल अशा भाषेत विरोधकांचा पंचनामा करायचे. त्यावर फिदा होणाऱ्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची संख्या वाढायला लागली. काँग्रेसअंतर्गत असणारे गट-तट, मतदारसंघातील तत्कालीन परिस्थिती अशा स्थितीत गेल्या ३५ वर्षांत अनेकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला आणि खालीही ठेवला. पण, शिवसेनेचा जिल्ह्यातील आवाज चढत राहिला. 

२०१४ साली इतक्या टिपेला गेला की १० पैकी सहा आमदार शिवसेनेचे होते. परंतु, २०१९ ला हाच आवाज क्षीण झाला. फुटीनंतर आता सेनेपुढे जनाधार टिकविण्यासाठी काम करावे लागेल. काँग्रेस नेत्यांनी सहकाराच्या माध्यमातून पारंपरिक मतदारसंघाला मगरमिठी घातल्यानंतर ती सोडविणे अजिबातच सोपे नव्हते. परंतु, याला छेद देत पहिल्यांदा १९९० मध्ये शाहूवाडीतून बाबासाहेब पाटील-सरुडकर आणि कोल्हापूर शहरातून दिलीप देसाई यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला.

१९९५ ला शाहूवाडीतून संजय गायकवाड आणि कोल्हापूर शहरातून सुरेश साळाखे विजयी झाले. याच दरम्यान सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतरच्या पोटनिवडणुकीत संजय घाटगे शिवसेनेतून बाजी मारली. परंतु, १९९९ ला एकमेव सुरेश साळोखे विजयी झाले. २००४ साली शाहूवाडीतून सत्यजित पाटील यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला, तर इकडे शहरात मात्र राजघराण्याचे वलय आणि नवा चेहरा यामुळे मालोजीराजेंनी बाजी मारली. 

२००९ मध्ये मिणचेकर, क्षीरसागर जायंट किलर

  • २००९ मध्ये शिवसेनेने दहापैकी सहा जागा लढविल्या आणि त्यातील तीन जिंकल्याही. करवीरमधून चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर यांनी बाजी मारली, तर विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली. 
  • शिवसेनेचा सुरुवातीचा प्रवास मिळेल त्यांना सोबत घेऊन झाला. शिवसेना फुटल्यानंतर आता शिंदेसेनेसमोर हा जनाधार टिकविण्याचे आव्हान आहे.


पाच वर्षांचा सुवर्णकाळ

  • २०१४ हे शिवसेनेसाठी सुवर्णकाळ ठरले. जिल्ह्यातील १० पैकी तब्बल ६ शिवसेना उमेदवार विजयी झाले आणि दोन्ही काँग्रेस पिछाडीवर गेल्या. या सहापैकी चौघेजण हे पारंपरिक राजकीय घराण्यातील नव्हते. परंतु, यातील नरके यांनी शेकापचा प्रभाव ओसरल्यानंतर ती जागा घेत आपले बस्तान बसविले. 
  • आबिटकरांनी राष्ट्रवादीची साथ सोडून एक निवडणूक अपक्ष लढविली. नवा चेहरा, गतिमान संपर्क आणि समूहाची कामे करण्यावर भर देत त्यांनी बस्तान बसविले. 
  • कोल्हापूर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन क्षीरसागर दोन वेळा आमदार झाले, तर सरुडकरांनी गरज असेल तेव्हा भगवा खांद्यावर घेतला. 
  • उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी सोडून घात साधली, तर डॉ. सुजित मिणचेकर यांनी पहिली संधी घेत नंतर दुसऱ्यांदा बाजी मारली.

Web Title: The challenge of retaining ShivSena base in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.