Kolhapur: बाळूमामा देवालयातील विश्वस्तांना क्लीन चीट, सचिवांना वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:30 PM2024-04-27T12:30:40+5:302024-04-27T12:30:54+5:30
शिवराज नाईकवाडे यांचा पत्ता कट
कोल्हापूर : बाळूमामा देवालय ट्रस्टमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या विश्वस्तांना धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी अखेर शुक्रवारी क्लीन चीट दिली. कार्याध्यक्ष पदावर निरीक्षक रागिणी खडके यांची नियुक्ती केली असून मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांचे पद कायम ठेवले आहे. सचिव रामचंद्र कोणकेरी यांना विश्वस्तांमधून वगळले आहे. हा निकाल एकतर्फी असून आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करू असे तक्रारदारांनी म्हटले आहे.
बाळूमामा देवालयाचे दिवंगत कार्याध्यक्ष राजाराम मगदूम, मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रामचंद्र कोणकेरी यांच्यावर ट्रस्टमध्ये कोट्यवधींचा घोटाळ्याचा आरोप केला होता. याबाबत प्रवीण पाटील, रवींद्र पाटील व हणमंत पाटील यांनी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी कार्यालयाने २०२२ शिवराज नाईकवाडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी केलेल्या चौकशी अहवालात विश्वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोलच झाली होती.
याची दखल घेत तत्कालीन धर्मादाय सहआयुक्तांनी स्वयंखुद्द प्रेरणेने पुढाकार घेत विश्वस्त मंडळ बरखास्त करून नाईकवाडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. या प्रकरणाची धर्मादाय सहआयुक्तांपुढे सुनावणी करून त्याचा निकाल ३० एप्रिलपर्यंत द्यावा द्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार गेली वर्षभर यावर सुनावणी सुरू होती. अखेर शुक्रवारी धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी निकाल दिला.
या निकालात पवार यांनी भ्रष्टाचाराचा आरोप असलेले मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांना क्लीन चिट देत त्यांचे पद कायम ठेवले आहे. राजाराम मगदूम यांचे निधन झाल्याने रिक्त असलेल्या कार्याध्यक्ष पदावर ट्रस्टचे कारभार सांभाळत असलेल्या निरीक्षक रागिणी खडके यांनी नियुक्ती केली आहे. उर्वरित सर्व विश्वस्तांना क्लीन चिट देऊन त्यांचे विश्वस्तपद कायम ठेवले आहे.
फक्त सचिव दोषी
भ्रष्टाचारात कार्याध्यक्ष, मानद अध्यक्ष आणि सचिवांवर आरोप असताना निकालात फक्त सचिव रामचंद्र कोणकेरी यांना दोषी ठरवून विश्वस्तांमधून वगळले आहे.
शिवराज नाईकवाडे यांचा पत्ता कट
बाळूमामा देवालयाचे प्रशासक म्हणून उत्तम कार्य केलेले शिवराज नाईकवाडे यांचा ट्रस्टच्या कारभारातून बाजूला केले आहे. त्यांना कारभार विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे.
सहआयुक्तांकडून असा एकतर्फीच निकाल अपेक्षित होता. प्रमुख भ्रष्टाचाऱ्यांवरील गंभीर आरोप, तसेच सबळ पुरावे असूनही त्यांचा विचार न करता उलट त्यांना पाठीशी घातले आहे. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू. - प्रवीण पाटील, तक्रारदार
प्रमुख व्यक्ती वगळता अन्य विश्वस्तांचा दोष नसताना त्यांना या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले होते. त्यांचे विश्वस्तपद कायम राहिल्याने त्यांना न्याय मिळाला. - विजय गुरव, देवालय विश्वस्त तथा सरपंच आदमापूर.