Kolhapur: संवर्धन प्रक्रिया पूर्ण; अंबाबाई मूर्तीचे उद्यापासून पूर्ववत दर्शन
By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 15, 2024 07:38 PM2024-04-15T19:38:28+5:302024-04-15T19:38:43+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली संवर्धन प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली संवर्धन प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली आहे. आज मंगळवारी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी ११ नंतर दर्शन सुरू होईल.
श्री अंबाबाई मूर्तीची मोठी झीज झाल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार शुक्रवार व शनिवारी औरंगाबाद पुरातत्व रसायनतज्ञ विभाग शाखेच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली.
रविवारी व सोमवारी दाेन दिवस संवर्धन प्रक्रिया करण्यात आली आहे. ही संवर्धन प्रक्रिया पुरातत्व रसायनतज्ञ विभागाचे उपअधिक्षक डॉ. एस. विनोद कुमार, वरिष्ठ प्रतिमाकार सुधीर वाघ, प्रतिमाकार मनोज सोनवणे यांनी पूर्ण केली आहे.
आज मंगळवारी पहाटे अंबाबाईची मूळ मूर्ती पुजाऱ्यांकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठेचे धार्मिक विधी केले जातील. यासाठी सकाळचे अकरा वाजून जातील. त्यानंतर भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येईल.