Kolhapur Flood: रेड झोन कागदावर, पूर रस्त्यावर; २०१९ पूर्वीच पूरक्षेत्रात मोठी बांधकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:22 PM2024-07-30T17:22:51+5:302024-07-30T17:23:10+5:30
प्राधिकरणाने तरी सावध राहावे
कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे पूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून केलेली बांधकामे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पूर क्षेत्रातील बांधकामे थांबविण्यासाठी तातडीने ब्ल्यू लाइन व रेड लाइन मार्किंग होणे आवश्यक होते; परंतु रेड झोन क्षेत्र अंतिम करण्याची प्रक्रियादेखील जाणीवपूर्वक रखडवली गेली. त्याचा फटका मात्र पुढे वर्षानुवर्षे नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तरी सावध होऊन अशी चूक करू नये, अशी अपेक्षा आहे.
जलसंपदा विभागाने रेडझोन निश्चित करून ब्ल्यू लाइन व रेड लाइनचे मार्किंग केले असून, त्याचे नकाशे महापालिका प्रशासनाला सादर केले आहेत. दि. ७-१२-२०१९ रोजी पहिली ब्ल्यू लाइन पूर्ण झाली, त्यानंतर दि. ३-०६-२०२२ रोजी दुसरी रेडलाइनही निश्चित केली गेली. त्यानंतर महापालिका नगररचना विभागाकडून सध्या बांधकामाबाबत कडक निर्बंध लादले आहेत; परंतु रेडझोन उशिरा जाहीर करण्याचा प्रकार म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’ असेच म्हणावे लागते.
सन २०१९ पूर्वी शहरातील पूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. पूर क्षेत्रात बांधकामाला परवानगी देताना नगररचना विभागाला भविष्यकाळातील महापुराच्या काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरणार यांची शंका होती. त्यामुळे पूर क्षेत्रात बांधकाम परवानगी देताना भराव टाकायचा नाही, तीन मीटर उंचीवर स्लॅब टाकून बांधकामे करायची. खालची जागा ही वाहनतळ म्हणून वापरावी अशा अटी घालण्यात आल्या. दुर्दैवाने महापालिकेचे नियम म्हणजे मोडण्यासाठीच असतात असा समज झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी मोठे भराव टाकून इमारती उभारल्या. ही बांधकामे सुरू असताना आपणच घातलेल्या अटी पाळल्या आहेत की नाही याची खत्री नगररचना विभागाने करून घेतली नाही.
सन २०१९ पूर्वी झालेल्या बेजबाबदार बांधकामे आणि भरावांमुळे २०१९ व २०२१ चे मोठे महापूर आले. त्यानंतरही आलेल्या महापुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यावर्षीही बऱ्याच घरांना, अपार्टमेंटना महापुराच्या पाण्याने विळखा घातला. यापुढील काळातही अशी समस्या वारंवार उद्भवणार आहे. कारण रेडझोन निश्चित झाला असला तरी पुढील काळात बांधकामे होणार नाहीत. मात्र, झालेली बांधकामे आहेत तशीच राहणार आहेत. त्याला काहीच करता येणार नाही.
इंद्रजित कॉलनीत टाकला भराव
इंद्रजित कॉलनी, जाधववाडी येथे दरवर्षी पाणी येत आहे. वास्तविक जेव्हा ४७ फूट पाणी पातळी असेल तेव्हाच पाणी यायचे; परंतु या भागात व आसपासच्या भागात जो भराव टाकण्यात आला आहे, त्यामुळे यावर्षी हे पाणी कॉलनीमध्ये आले. गटारी, नाले तुंबून या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्याने हे पाणी तेथे साचून राहत आहे. या परिसरात भराव टाकल्यामुळे सर्वांना दरवर्षी स्थलांतरित होण्याची वेळ आली असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.
आता कशी परवानगी दिली जाते
- नदीपात्र ते ब्ल्यू लाइन बांधकाम परवानगी नाही
- ब्ल्यू लाइन ते रेडलाइन काही अटींवर परवानगी
- भराव टाकायचा नाही, तीन मीटर स्टील्ड बांधकाम