VidhanSabha Election: कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघातील चित्र स्पष्ट; सहा ठिकाणी मल्लांची चाचपणी
By राजाराम लोंढे | Published: September 23, 2024 04:20 PM2024-09-23T16:20:53+5:302024-09-23T16:22:14+5:30
जागा वाटपात आघाडीत काँग्रेस तर महायुतीत शिंदेसेना बाजी मारणार : बंडखोरी शमविण्याचे नेत्यांसमोर आव्हान
राजाराम लोंढे
कोल्हापूर : विधानसभेचे बिगुल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वाजणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या बांधणीला वेग आला आहे. कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, शाहूवाडी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, सहा ठिकाणी मल्लांची चाचपणी सुरू आहे. जागा वाटपाचा गुंता अद्याप सुटलेला नसला तरी आघाडीत काँग्रेस व महायुतीमध्ये शिंदेसेना बाजी मारण्याची शक्यता आहे.
कागल : कागलचे मैदान आणि मल्लही तेच आहेत. महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ तर आघाडीकडून समरजित घाटगे रिंगणात आहेत. उद्धवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड दिसत असले तरी येथे निकराची झुंज पहावयास मिळू शकते.
कोल्हापूर दक्षिण : आघाडीचे आमदार ऋतूराज पाटील व भाजपचे अमल महाडिक किंवा शौमिका महाडिक यांच्यात सरळ लढत होणार आहे. विधानसभेच्या मागील निवडणुका पाहिल्या तर येथे निकराची झुंज पहावयास मिळाली आहे, यावेळेलाही काँटे की टक्कर होणार हे निश्चित आहे.
शाहूवाडी : महायुतीकडून आमदार विनय काेरे व आघाडीकडून उद्धवसेनेचे सत्यजीत पाटील-सरुडकर या पारंपरिक मल्लातच झुंज होणार आहे. सरुडकर यांना लोकसभेला मताधिक्य मिळूनही झालेल्या पराभवामुळे त्यांच्याविषयी काहीशी सहानुभूती दिसत आहे. पण, विकासकामे व संपर्काच्या बळावर आमदार कोरे रिंगणात उतरल्याने लढाई तितकीशी सोपी नाही.
करवीर : आघाडीकडून राहुल पाटील तर शिंदेसेनेकडून चंद्रदीप नरके यांच्यातच सरळ लढत आहे. पाटील यांच्या पाठीशी आमदार सतेज पाटील व ‘गोकूळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांचे पाठबळ आहे. मात्र, चंद्रदीप नरके हे कसलेला मल्ल असल्याने त्यांनी काँग्रेसच्या गटाला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. ‘जनसुराज्य’चे संताजी घोरपडे यांनी शड्डू ठोकून संपर्क मोहीम गतिमान केली आहे. करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी हे तिसऱ्या आघाडीच्या संपर्कात आहेत. घोरपडे व सूर्यवंशी यांच्या बंडखोरीची झळ कोणाला बसणार यावरच येथील विजयाचे गणित अवलंबून आहे.
कोल्हापूर उत्तर : आघाडी व महायुतीमध्ये उमेदवारीवरून चढाओढ आहे. काँग्रेसने दावा केला असला तरी उद्धवसेनेकडून उपनेते संजय पवार यांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीकडून राजेश क्षीरसागर हे प्रचाराला लागले आहेत, तर भाजपकडून कृष्णराज महाडिक व सत्यजित कदम तयारीला लागले आहेत.
चंदगड : राष्ट्रवादीकडून आमदार राजेश पाटील तयारीला लागले आहेत. मात्र, भाजपचे शिवाजी पाटील यांनीही तयारी केल्याने महायुतीत पेच आहे. आघाडीकडून अद्याप चाचपणीच सुरू आहे.
हातकणंगले : काँग्रेसकडून आमदार राजू आवळे व जनसुराज्यकडून अशोकराव माने यांच्यात पुन्हा कुस्ती होणार आहे. ‘ताराराणी’कडून जयश्री कुरणे यांची उमेदवारी जाहीर करून आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुतीची कोंडी केली आहे. डॉ. सुजीत मिणचेकर यांनीही तयारी केली असून, ते कोणाकडून लढणार याची उत्सुकता आहे.
इचलकरंजी : ‘ताराराणी’ पक्षाकडून राहुल आवाडे, आघाडीकडून मदन कारंडे तर शिंदेसेनेकडून रवींद्र माने अशी लढत होऊ शकते. येथील राजकीय समीकरणे प्रत्येक निवडणुकीत बदलत असल्याने भाजपची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
शिरोळ : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मतांच्या बेरजेसाठी शाहू आघाडी स्थापन केली असली तरी महायुतीचे तेच उमेदवार राहणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून गणपतराव पाटील व उद्धवसेनेचे उल्हास पाटील यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, हे पहावे लागणार आहे. ‘स्वाभिमानी’कडून राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा असली तरी ते स्वत: रिंगणात राहण्याची शक्यता धूसर असून, नवीन चेहऱ्याला ते मैदानात उतरवू शकतात.
राधानगरी : शिंदेसेनेकडून आमदार प्रकाश आबीटकर हे कामाला लागले आहेत. त्यांच्याविरोधात मेहुण्या-पाहुण्यांनी शड्डू ठोकला असला तरी आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? यावर दुरंगी की तिरंगी लढतीचे चित्र अवलंबून आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी उमेदवारीसाठी निकराचे प्रयत्न सुरू केले असले तरी ‘मशाल’ कोणाच्या हातात द्यायची, या निर्णय प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.