शिक्षकदिनीच कंत्राटी शिक्षक भरतीचा काढला आदेश, जखमेवर जणू मीठच चोळले
By विश्वास पाटील | Published: September 6, 2024 12:16 PM2024-09-06T12:16:28+5:302024-09-06T12:17:29+5:30
वीस पटसंख्येचा शाळा : निवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्याचे धोरण
विश्वास पाटील
कोल्हापूर : चक्क शिक्षकदिनीच राज्य शासनाने कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन आदेश काढून भावी शिक्षकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड., बी.एड. अर्हताधारक निव्वळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात ५० हून अधिक सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली आहे.
शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी हा आदेश (क्रमांक संकीर्ण-२०२४-प्र.क्रं६६६-टीएनटी-१) काढला. त्यात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा निवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यास्तव डी.एड., बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
डी.एड., बी.एड. झालेल्या उमेदवारांची संख्या मोजता येत नाही एवढी असताना त्यांचीच भरती करण्याऐवजी निवृत्त शिक्षकांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याने शिक्षकांमध्ये संताप आहे. गेल्यावर्षीच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय घेतला आहे. डी.एड., बी.एड. झालेला नवीन उमेदवार घेतल्यास तो एकतर कमी मानधनावर काम करायला तयार नसतो. आणि सेवेत घेतल्यावर त्यांचे कायम करण्यासाठी आंदोलने सुरू होतात. हे टाळण्यासाठी सरकारने निवृत्त शिक्षकांनाच घेण्याचे धोरण सुरू केले आहे.
सेवानिवृत्तांची अर्हता..
सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल वयोमर्यादा ७० राहील. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून तो निवृत्त झालेला असावा. त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित, प्रस्तावित नसावी. ज्या गटासाठी नियुक्त केली जाणार आहे, त्याचसाठी सेवाकाळात अध्यापन केलेले असावे. ही नियुक्ती सुरुवातीला वर्षासाठी राहील. गुणवत्तेनुसार हा कालावधी जास्तीत जास्त ३ वर्षांचा राहील.
डी.एड., बी.एड.साठी अर्हता..
नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू. ही कंत्राटी भरती असल्याने शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे, सामावून घेण्याचे व नियमित सेेवेचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाहीत. सुरुवातीची नियुक्ती वर्षासाठीच असेल. गुणवत्तेनुसार प्रतिवर्षी नूतनीकरण करण्यात येईल.
१५ हजार मानधन
या शिक्षकांना कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त दरमहा १५ हजार रुपये फक्त मानधन दिले जाईल. एकूण १२ रजा देय व त्याहून जास्त रजा विनावेतन असतील. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. त्यांनी बंधपत्र लिहून देणे बंधनकारक राहील. प्राथमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र, इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेऊन नियुक्ती आदेश द्यायचे आहेत. शाळेची पटसंख्या २० झाल्यावर कंत्राटी सेवा समाप्त होऊन तिथे नियमित शिक्षकांची नियुक्ती होईल.