शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथदिंडीतून वाचनसंस्कृतीचा जागर, सोमवारी दीक्षांत समारंभ
By पोपट केशव पवार | Published: December 16, 2023 05:50 PM2023-12-16T17:50:48+5:302023-12-16T17:52:47+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. १८) होत आहे. या सोहळ्याची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीसह ग्रंथमहोत्सवाच्या ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. १८) होत आहे. या सोहळ्याची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीसह ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली. कमला महाविद्यालय येथे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले.
पालखीमध्ये भारताचे संविधान, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, संत नामदेव गाथा यांसह राजा शिवछत्रपती, राजर्षी शाहू स्मरणिका, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ग्रंथ ठेवले होते. तेथून टाळमृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला. वाचनसंस्कृतीचा जागर करीत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी राजारामपुरीतून आईचा पुतळा आणि सायबर संस्थेमार्गे विद्यापीठाच्या प्रांगणात आली. प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून व अभिवादन करून पालखी अखेरीस राजमाता जिजाईसाहेब बहुउद्देशीय सभागृहात आणण्यात येऊन तेथे स्थापित करण्यात आली. पालखी मार्गावर सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साह ओसंडून वाहत होता.
वैविध्यपूर्ण विषयांवरील ग्रंथांची पर्वणी
ग्रंथदिंडीनंतर सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या आमराई परिसरात ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिकांसह राज्यभरातील २२ प्रकाशक व ग्रंथविक्रेते महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून विविध विषयांवरील हजारो ग्रंथ वाचकांना पाहणी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रंथप्रेमी व वाचनवेड्या व्यक्तींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे.