...तेव्हा एकाच मतदाराने केले होते दोन वेळा मतदान!
By संदीप आडनाईक | Published: May 4, 2024 12:08 PM2024-05-04T12:08:18+5:302024-05-04T12:08:59+5:30
कोल्हापुरातून रत्नाप्पाण्णा कुंभार, बाळासाहेब खर्डेकर, भाऊसाहेब महागांवकर विजयी
संदीप आडनाईक
कोल्हापूर : एकाच मतदाराने दोन वेळा मतदान केल्यास आज तो गुन्हा मानला जात असला तरी, पहिल्या लोकसभेला अधिकृतपणे दोन वेळा मतदान करण्याची परवानगी होती. मात्र त्यासाठी काही मतदारसंघ निश्चित केले होते. देशाच्या पहिल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एकाच मतदाराने दोन उमेदवारांना निवडून देण्यासाठी चक्क दोन वेळा मतदान केले, हे सांगितले तर आज आश्चर्य वाटेल. कोल्हापूरकरांनी १९५१ मध्ये रत्नाप्पाण्णा कुंभार आणि बाळासाहेब खर्डेकर तसेच १९५७ मध्ये एस. के. डिगे आणि भाऊसाहेब महागांवकर यांना दोन वेळा मतदान केले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चार वर्षांनी २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ अशा चार महिने चाललेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८९ आणि १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतही ९० मतदारसंघ द्विसदस्यीय होते. म्हणजे, एकाच मतदारसंघातून सर्वसाधारण आणि राखीव असे दोन सदस्य लोकसभेवर निवडून येत.
त्यावेळी राखीव जागांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नव्हता. यामुळे खुल्या प्रवर्गातून एक आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातून दुसरा प्रतिनिधी निवडण्यासाठी एकाच मतदाराने या त्यांना दोन वेळा मतदान केले; पण त्यांना आपली दोन्ही मते एकाच उमेदवाराला देण्याची परवानगी नव्हती.
१९६२ पासून आरक्षित मतदारसंघ
देशात १९६० पर्यंत एकाच मतदारसंघातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी पाठवण्याची तरतूद असलेले काही मतदारसंघ होते. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ही पद्धत बंद झाली. यानंतर आरक्षित मतदारसंघांची निर्मिती झाली आणि एका मतदारसंघातून केवळ एकच प्रतिनिधी निवडून संसदेत पाठविले. सध्या अनुसूचित जातीचे ८४, अनुसूचित जमातीचे ४७ आणि खुल्या प्रवर्गातील ४१२ मतदारसंघांतून प्रतिनिधी संसदेत पाठविले जातात.