video चिचुंद्री आणि सरड्याच्या झुंजीत कावळा मात्र उपाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:29 PM2022-06-13T12:29:16+5:302022-06-13T12:29:38+5:30
कावळ्याचा धोका ओळखून बराच वेळ एकमेकांशी झुंज करणारे चिचुंद्री आणि सरडा आपली बराच वेळ चाललेली झुंज थांबवून बिळात पळून गेल्याने सहीसलामत बचावले.
रमेश पाटील
कसबा बावडा/कोल्हापूर : 'दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ ' अशी मराठीत एक म्हण आहे. पण या म्हणी प्रमाणेच एक कावळ्याने फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला फायदा उठवता आला नाही. कावळ्याचा धोका ओळखून बराच वेळ एकमेकांशी झुंज करणारे चिचुंद्री आणि सरडा आपली बराच वेळ चाललेली झुंज थांबवून बिळात पळून गेल्याने सहीसलामत बचावले.
घडला प्रकार असा : कोल्हापुरातील बावडा पॅव्हेलियन ट्रॅकवर आज, सोमवारी सकाळी सातच्या सुमारास चिचुंद्री आणि सरड्याची झुंज सुरु होती. चिचुंद्रीने सरड्याचा एक पाय तोंडात पकडून ओडत होती. सरडाही चिचुंद्रीचे लचके तोडत होता. तब्बल दहा ते पंधरा मिनिटं ही झुंज सुरू होती. ट्रॅक वर नेहमी फिरायला येणारे लोक ही झुंज पाहत होते. या झुंजीचा व्हिडिओ बावडा पॅव्हिलियन ग्रुपचे कार्यकर्ते सरदार पाटील यांनी केला. बराच वेळ चाललेली ही झुंज पाहण्यासाठी थोड्याच वेळात ट्रॅकवरील लोकांनी गर्दी केली.
चिचुंद्री आणि सरडा यांची चाललेले झुंज बराच वेळ शेजारच्या झाडावर बसलेला कावळा पाहत होता. ट्रॅक वरील फिरायला आलेले लोकही पांगले. गर्दी कमी झाल्याचे पाहून कावळ्याने झपकन येऊन चिचुंद्रीला टोच मारुन तो तिला उचलून घेऊन जाणार असे दिसताच तिने तोंडात धरलेला सरड्यांचा पाय सोडला. चिचुंद्रीच्या तावडीतून आपली सुटका होताच रक्तबंबाळ झालेल्या सरडा झपकन झाडावर पसार झाला. जखमी चिचुंद्रीही कावळ्याच्या तावडीतून आपली सुटका करत बिळात पसार झाली. आपल्या हाती काहीच न लागल्याने काळा मात्र कावकाव करत उडत गेला.
कोल्हापूर: चिचुंद्री आणि सरड्याच्या झुंजीत, कावळा मात्र उपाशी...सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/BoBBiklBmc
— Lokmat (@lokmat) June 13, 2022