धामणी नदीवरील बंधारा गेला वाहून, शेतीचे नुकसान; कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 11:05 AM2022-12-10T11:05:43+5:302022-12-10T11:19:54+5:30
शेतकऱ्यांमधून पाटबंधारे विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महेश आठल्ये
म्हासुर्ली (राधानगरी): पाटबंधारे विभागाने गत आठवड्यात केलेल्या मनमानी उपसा बंदीमुळे बंधाऱ्यात वरून वाहून आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे धामणी नदीवरील बळपवाडी (ता. पन्हाळा) गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी ) या दरम्यान असणारा मातीचा बंधारा आज सकाळच्या सुमारास फुटला. बंधारा फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पनोरे (ता. पन्हाळा) परिसरात पाणी गेल्याने त्या परिसरातील विद्युत पंप पाण्यात बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
धामणी खोऱ्यात धामणी धरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्याकडून ठिकठिकाणी मातीचे बंधारे घातले जातात. अंबर्डे (ता. पन्हाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी यावर्षी त्यात उशिराने पाणीसाठा केल्यामुळे हा बंधारा रिकामा राहिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एकतर्फी निर्णय घेत गत आठवड्यात उपसा बंदी जाहीर केली होती. या उपसा बंदीच्या निर्णयामुळे या परिसरात तीव्र असंतोष पसरला होता.
उपसा बंदीमुळे वरील धरणातील पाणी गवशी पाटील वाडी -बळपवाडी बंधाऱ्यात येऊन साठले होते. अंबर्डे बंधारा रिकामा असल्यामुळे या मातीच्या बंधार्यावर पाण्याचा दाब वाढल्याने हा बंधारा मध्येच फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. तर, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असून या बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या दोन्ही नदी तीरावरील शेकडो मोटर पंप पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांमधून पाटबंधारे विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.