मुलगा स्वामींचा अवतार; घरात दरबार थाटणाऱ्या पालकांवर गुन्हा; कोल्हापुरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:31 AM2023-12-27T11:31:24+5:302023-12-27T11:33:21+5:30

अल्पवयीन मुलाचा गैरवापर केल्याची तक्रार

The darbar filled the house pretending that the boy was an avatar of Swami Samarth in Kolhapur | मुलगा स्वामींचा अवतार; घरात दरबार थाटणाऱ्या पालकांवर गुन्हा; कोल्हापुरातील प्रकार

मुलगा स्वामींचा अवतार; घरात दरबार थाटणाऱ्या पालकांवर गुन्हा; कोल्हापुरातील प्रकार

कोल्हापूर : पंधरा वर्षीय मुलगा स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे भासवून घरात दरबार थाटणाऱ्या पालकांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. हा प्रकार कसबा बावडा येथील कदमवाडी रोडवरील राम चौगुले कॉलनीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. याबाबत मुलाचे पालक इंद्रायणी हितेश वलादे (वय ३६) आणि हितेश लक्ष्मण वलादे (वय ३७, दोघे मूळ रा. कॅम्प एरिया, गडचिरोली, सध्या रा. कदमवाडी रोड, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे गडचिरोली येथील वलादे दाम्पत्य किरण पालकर यांच्या घरी भाड्याने राहते. आपला १५ वर्षीय मुलगा स्वामींचा अवतार असून, त्याच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे ते लोकांना सांगत होते. कुलदैवताची पूजा करा, स्वामींच्या नावाने प्रसाद करा आणि पाच गुरुवार दर्शनासाठी या, असे ते लोकांना सांगत होते. यातून त्यांनी घरातच दरबार थाटला होता. श्री बालस्वामी समर्थ भक्त मंडळाचीही स्थापना केली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पारायणाचा मंगळवारी अखेरचा दिवस होता.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलिसांना माहिती देऊन अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वलादे यांच्या घरी जाऊन माहिती घेतली असता दरबाराची वस्तुस्थिती समोर आली. अल्पवयीन मुलाचा गैरवापर करून अंधश्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी बालस्वामीच्या पालकांवर गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक प्रणाली पवार अधिक तपास करीत आहेत.

बालस्वामीस शारीरिक व्यंग

वलादे दाम्पत्याचा मुलगा १५ वर्षांचा असला तरी त्याच्या शरीराची योग्य वाढ झाली नसल्याने तो आठ ते दहा वर्षांचा असल्याचे दिसते. त्याच्या शारीरिक व्यंगाचा गैरवापर करून दरबार थाटला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दहा हजार लोकांचा महाप्रसाद

दत्त जयंतीनिमित्त बालस्वामी भक्त मंडळाने दहा हजार लोकांसाठी महाप्रसाद तयार केला होता. रात्री महाप्रसादासाठी भाविकांची अक्षरश: झुंबड उडाली होती. गर्दी नियंत्रित करण्यासाठी भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांसह खासगी सुरक्षा रक्षकही तैनात केले होते.

या गैरकृत्यात मुलाचे आई-वडील सामील आहेत. हे मानवी हक्काबरोबर बालहक्काचे उल्लंघन आहे. यासाठी गरज पडल्यास बालहक्क आयोगाकडे दाद मागितली पाहिजे. त्याआधी स्थानिक पोलिसांनी बालस्वामीचे प्रकरण थांबवावे. कोणाचा तरी अवतार असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. - मुक्ता दाभोळकर, अंनिसच्या कार्यकर्त्या

Read in English

Web Title: The darbar filled the house pretending that the boy was an avatar of Swami Samarth in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.